देवेंद्र फडणवीसांची संयमी भुमिका म्हणजे त्यांची दुर्बलता समजू नये, असा इशाराच भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे. मराठा समाजाने जो विश्वास जरांगे पाटलांवर दाखवलाय त्यातून अहंकार येता कामा नये. ते आपल्या व समाजाच्या हिताचे नाही, असे मत भाजप गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. कारण अहंकारातून ऱ्हास झाल्याची अनेक उदाहरणे पुढे आली असून जरांगे यांचा द्वेष फक्त भाजप आणि देवेंद्र फडणवीस आहेत, असेही दरेकर यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र हा पुरोगामी असून अठरा पगड जातींना एकत्रित घेऊन छत्रपतींनी राज्य केले. ओबीसी आरक्षणाला संविधानिक धक्का लागू शकतो का?ओबीसीतून आरक्षण द्या अशा प्रकारे शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते सांगू शकतात का? किंबहुना ओबीसीतून आरक्षण द्या हे ते लिहून देणार आहेत का? सरकार सकारात्मक असताना चर्चा सोडून वातावरण कलुषित होऊन समाजात जातीय तेढ निर्माण होत नाही का? उद्या जर ही दरी मोठी झाली तर साधणार कशी की हा महाराष्ट्र जातीपातीत कुणाला दुभंगवायचा आहे का? याचेही उत्तर मागितले पाहिजे, असेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते सह्याद्रीवरील बैठकीला उपस्थित राहिले नाहीत त्यांना मराठा समाजाच्या हितासाठी समन्वयाची भुमिका घेत असताना आपण का गेला नाहीत अशी ढुंकूनही एका शब्दाने विचारणा केली नाही. यावेळी दरेकरांनी सरकारने मराठा समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या योजना, सवलतींची यादीही वाचून दाखवली.
घाबरणारी औलाद आमची नाही
दरेकर म्हणाले की, आम्ही लाठ्या, काठ्या, आंदोलने, रेल्वे अडवणे, रस्ता रोको, पोलिसांशी संघर्ष करून मार खाल्ला आहे. घाबरणारी औलाद आमची नाही. पण तुम्हाला तिथे या ही कुठली प्रवृत्ती. मी भाजपाचे मराठा समाजाचे सगळे आमदार घेऊन येतो. तुम्ही पहिले यात देवेंद्र फडणवीसांची काही चूक नाही, त्यांनी मराठा समाजाला अनेक गोष्टी दिल्या आहेत अशी जाहीर कबुली द्या मी एकटा काय ५० लोकं येतो. चर्चा मंत्रालयात, सह्याद्रीवर सरकारी दरबारी होते. आपण या. भूमिकेत संशय वाटेल असे होऊ नये हे तमाम मराठा समाज जो बोलत नाही त्याच्या मनात आहे ती भावना मी व्यक्त केल्याचे दरेकर यांनी म्हटले.