प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आखाडा परिषदेने मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली आहे. आज कोणत्याही आखाड्याकडून अमृत स्नान होणार नाही. आखाड्यां कडून त्यांच्या मिरवणुकांना माघारी बोलावण्यात आले आहे.
घटना कधी घडली?
प्रयागराज येथील कुंभमेळ्यात दुसऱ्या अमृत स्नानाच्या पूर्वी चेंगराचेंगरी झाली. रात्री १ वाजेच्या सुमारास चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. जिथं लोक झोपली असता त्या ठिकाणी मागील बाजूनं लोक आले आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्याचवेळी लाखो लोक संगमावर स्नान करत होते. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि जखमींना बाहेर काढण्यात आलं.
सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं. दुसऱ्या घाटावर स्नान करायला ते तयार नव्हते. त्यामुळं एका ठिकाणी गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली. यानंतर पळापळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार १११ ते १२२ पोल नंबरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेतील जखमींना स्वरुप रानी नेहरु रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
चेंगराचेंगरी झाल्याच्या घटनेनंतर सातत्यानं संगम घाटावर कोणीही जाऊ नये, असं आवाहन केलं आहे संगम घाटावरुन लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
घटनेच्या साक्षीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. प्राथमिक माहितीनुसार ५० ते ८० लोक जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, प्रशासनानं अद्याप आकडेवारी जाहीर केलेली नाही.
रवींद्र पुरी यांनी या महाकुंभचं साक्षीदार व्हावं असं लोकांना आवाहन केलं होतं. आमच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद दिला होता. रवींद्र पुरी यांनी आता वसंत पंचमीच्या दिवशी अमृत स्नाना संदर्भात निर्णय घेणार असल्याचं म्हटलं. आज होणारं अमृत स्नान टाळावं लागणार आहे. आजच्या अमृत स्नानासाठी तयारी केली होती, कदाचित नियतीला ते मान्य नसेल. प्रयागराजमध्ये जिथं आहेत तिथं त्यांनी थांबावं, असं आवाहन पुरी यांनी केलं आहे.