महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना गती

जळगाव : दरवर्षी महावितरणकडून मान्सूनपूर्व आगमनापूर्वी विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातात. याच पार्श्वभूमीवर वीज वाहिन्या, खांब, रोहित्रांचे तणाव तसेच विद्युत यंत्रणेलगत असलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह विजवाहिन्या व यंत्रणांची देखभाल दुरुस्तीच्या कामांना महावितरणातर्फे सुरवात करण्यात आली आहे. जळगाव परिमंडळात अभियंते, जनमित्र व बाह्यस्त्रोत कामगारांच्या माध्यमातून ही कामे करण्यात येत आहेत.
पावसाळ्याच्या दिवसात महावितरणच्या ग्राहकांना अखंडित वीज मिळावी म्हणूनच ही कामे केली जात आहेत. यासाठी बऱ्याच वेळा सुरक्षीततेसाठी वीजपुरवठा खंडीत करण्यात येतो. त्यामुळे वीज ग्राहकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महावितरणची विद्युत यंत्रणा उघड्यावर असल्याने अनेक कारणांमुळे यंत्रणेमध्ये व्यत्यय येत असतो. वादळ वाऱ्यांमुळे अनेकवेळा पावसाळ्याच्या दिवसात ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे जास्त वेळ वीज पुरवठा राहून वीज ग्राहकांची गैरसोय होवू नये म्हणून महावितरण प्रशासनाकडून मान्सूनपूर्व कामांना प्राधान्य दिले जात आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेला स्पर्श करीत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे, दोन वीज वाहिन्या एकमेकांना स्पर्श करीत असतील त्या ठिकाणी स्पेसर्स टाकणे, फुटलेले पीन आणि इन्सुलेटर तपासणी व दुरुस्त करणे, आवश्यकता असल्यास बदलणे, रोहित्रांचे ऑइल तपासणी, ऑइल गळती थांबवणे, वाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहनांचे तात्पुरती असलेले जॉइंट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली करणे, जीर्ण झालेल्या वीजवाहिन्या बदल, जळालेल्या तुटलेल्या वायर बदलणे, वाकलेल्या खांबावर स्टेवायरचा आधार देणे तसेच उपकेंद्रातील सर्व यंत्रांची तपासणी करून आथीगच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणे आदी मान्सूनपूर्व केली जात आहे.

जळगाव परिमंडळातील सर्व अभियंते व कर्मचारी यांना उपाययोजना व सुरक्षितता बाळगून ही कामे योग्य ती काळजी घेऊन गतीने करण्याबाबत निर्देशित केले आहे. सोबतच ही कामे करण्याअगोदर ज्या परिसरात अथवा गावात मान्सूनपूर्व दुरूस्ती कामानिमित्त वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्या परिसरातील ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे सुद्धा यासंदर्भात पूर्वसूचना दिली जाते. ग्राहकांनी संयम बाळगावा व महावितरण कर्मचाऱ्याना सहकार्य करावे.
राजेंद्र हुमणे
मुख्य अभियंता, महावितरण जळगाव परिमंडळ