---Advertisement---
अंबाला : देशाच्या तिन्ही सेनादलांच्या प्रमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी हरयाणाच्या अंबाला येथील हवाई तळावरून भारतीय वायुसेनेचे अत्यंत शक्तिशाली आणि अत्याधुनिक लढाऊ विमान असलेल्या राफेलमधून उड्डाण घेत इतिहास रचला. ऑपरेशन सिंदूर मध्ये राफेल उडविणारी वैमानिक शिवांगी सिंग या रणरागिणीसोबत त्यांनी उड्डाण केले.
वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन अमित गेहनी यांनी विमानाचे संचालन केले. यावेळी त्यांनी राफेल उडवणारी भारतातील पहिली महिला वैमानिक शिवांगी सिंग यांच्यासोबत छायाचित्र काढले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान राफेल विमान पाडून शिवानी सिंगला अटक केल्याची अफवा पाकिस्तानने पसरविली होती.
हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी त्याचवेळी दुसऱ्या विमानातून उड्डाण केले. यापूर्वी मुर्मू यांनी ८ एप्रिल २०२३ रोजी आसाममधील तेजपूर येथील हवाई दलाच्या तळावरून सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानातून प्रवास केला होता.
वायुसेनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, सकाळी १० वाजता वायुसेनेच्या तळावर आगमन झाल्यानंतर राष्ट्रपतींना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. राफेल विमानात चढण्यापूर्वी त्यांनी जी-सूट घातला आणि हेल्मेट धरून आणि सनग्लासेस घालून, त्यांनी वायुसेनेच्या वैमानिक शिवांगी सिंग यांच्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी पोज दिली. सकाळी ११.२७ वाजता त्यांनी ग्रुप कॅप्टन अमित गेहनी यांच्यासोबत राफेलमधून उड्डाण केले. राफेल विमानातून प्रवास करणाऱ्या मुर्मू पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने अंबाला हवाई तळाचा वापर केला होता.
पाकिस्तानला थेट संदेश
भारताच्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेदरम्यान पाकिस्तानने एका भारतीय महिला वैमानिकाला पकडल्याचा दावा केला. त्यानंतर पाकिस्तानने या वैमानिकाची ओळख शिवांगी सिंग अशी करून दिली. मात्र भारताने मोहिमेचे छायाचित्र व व्हिडीओ जारी करीत पाकिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावले. त्यातच बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेल उडवण्यापूर्वी अंबाला हवाई दल तळावर शिवांगी सिंग यांच्यासोबत छायाचित्र काढत पाकिस्तानचे दावे खोडत थेट संदेश दिला.







