जळगाव : राज्यात अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, मुंबई-पुण्यानंतर जळगाव जिल्हा अपघातांच्या संख्येत अग्रस्थानी आला आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे बरेच नागरिक प्राण गमावत आहेत. विशेषतः दुचाकी चालकांमध्ये अपघातांचे प्रमाण अधिक आहे. “रस्ते अपघात टाळणे ही सामूहिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.
दर्शन फाऊंडेशन आणि आरोही मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत “सन्मान कर्तृत्वाचा नव्हे, दातृत्वाचा” या विशेष सन्मान सोहळ्यात डॉ. रेड्डी बोलत होते. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या पत्रकार, पोलीस, डॉक्टर, वकील, आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम बुधवार, २२ जानेवारी रोजी मानराज पार्क येथे पार पडला. अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानेश्वर ढेरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प प्रमुख राहुल पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रवीण बागडे, मोटर वाहन निरीक्षक विनोद चौधरी, सौरभ पाटील आणि सुयोग माने उपस्थित होते.
“वाहतूक नियम पाळणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. केवळ जनजागृती पुरेशी नाही, तर सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. हेल्मेटचा वापर दुचाकीस्वारांसाठी अनिवार्य आहे, कारण बहुतांश प्राणांतिक अपघातांमध्ये दुचाकीस्वारच बळी ठरतात. दर्शन फाऊंडेशनच्या उपक्रमामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल”, असेही डॉ. रेड्डी म्हणाले.
प्रास्ताविक फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश अजमेरा यांनी केले. त्यांनी सांगितले की, “दररोज रस्त्यांवर अपघातांच्या बातम्या ऐकायला मिळतात. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांची मालिका थांबवता येईल. समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे.”
यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रवीण बागडे, मोटर वाहन निरीक्षक विनोद चौधरी, तसेच पत्रकार शुभदा नेवे आणि अभिजित पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी
सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दर्शन फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश अजमेरा, उपाध्यक्ष कल्पेश मालपाणी, सचिव अल्पेश न्याती, रोहित चव्हाण, रुपेश अजमेरा, नरेंद्र पाटील, आणि वैभव सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले.