---Advertisement---
---Advertisement---
भुसावळ : येथील प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढीमधील बोगस कर्ज प्रकरणामध्ये संशयितांनी ७२९ धनादेश व १७५ सभासदांच्या नावाचा वापर करुन संस्थेची ९ कोटी ९० लाखात आर्थीक फसवणुक केली. याप्रकरणी ४५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आठ संचालकांसह आठ कर्मचारी अशा एकूण १६ जणांना अटक करण्यात आली. अटकेतील संशयित हे न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
भुसावळ येथील प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढीमध्ये आजी-माजी संचालक व कर्मचाऱ्यांनी कट कारस्थान करून खोट्या व बनावट सह्या करून बोगस कर्जाद्वारे गैरव्यवहार केला. दि. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीचे वैधानिक लेखापरिक्षण केले असता पोटनियमबाह्य कमाल कर्ज मर्यादेचे उल्लंघन करण्यासह खोटे व बनावट कर्जप्रकरणे मंजूर करून ते बेकायदेशीर वाटप केल्याचे समोर आले.
वसूल न झालेल्या कर्जामुळे सभासदांचा व संस्थेचा विश्वासघात झाला असून संस्थेचा कारभार पार पडण्यात पदाचा दुरुपयोग करून रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून संस्थेचे नुकसान केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. हा सर्व प्रकार समोर आल्याने लेखापरिक्षक प्रकाश चौधरी यांनी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एकूण ४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. गुन्हा वर्ग होताच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी १६ जणांना त्याच दिवशी अटक केली. ही कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सपोनि गणेश फड, उपनिरीक्षक शुभांगी पाटील, स फौ दिनेश पाटील, रतीलाल पवार, भरत जेठवे, निलेश सुर्यवंशी, समाधान पाटील, ईश्वर धनगर, विजय शिरसाठ, दिलीप चव्हाण, दीपक गुंजाळ, दीपक पाटील, महेंद्र सोनवणे यांच्या पथकाने केली.