पंतप्रधान मोदींनी सोडले सोनिया गांधींवर टीकास्त्र

जालोर : पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजपचे स्टार प्रचारक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (२२ एप्रिल) राजस्थानमधील जालोर येथे पोहोचले. येथे संबोधित करताना त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला. जे निवडणूक जिंकू शकत नाहीत त्यांना राज्यसभेतून जिंकवून वाचवले जात आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

विरोधी पक्ष आणि काँग्रेसच्या ‘इंडिया’ युतीवर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले, “तुम्ही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना राजस्थानमधून राज्यसभेवर उदारपणे पाठवले, ते बरेच दिवस आजारी होते, पण तुम्ही त्यांना राजस्थानमध्ये पुन्हा पाहिले का? जे निवडणूक लढवू शकत नाहीत, ते निवडणूक जिंकू शकत नाहीत.

काँग्रेसवर टीका करतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या काळात सरकार रिमोट कंट्रोलने चालवले जात होते. ते म्हणाले, “आज देशातील तरुणांना काँग्रेसचा चेहरा बघायचा नाही. काँग्रेसच्या आजच्या स्थितीसाठी ते स्वतःच दोषी आहेत. ज्या पक्षाने 60 वर्षे राज्य केले आणि एकेकाळी 400 जागा जिंकल्या, तो पक्ष आज निवडणूक लढवत नाही. 300 जागांवर आज काँग्रेसला उमेदवारी मिळू शकली नाही.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज देशात 25 टक्के जागांवर विरोधी आघाडीचे पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. निवडणुकीपूर्वी हीच परिस्थिती असेल तर निवडणुकीनंतर काय होईल.” या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, ज्यांना घरे मिळाली नाहीत, त्यांना तिसऱ्यांदा सरकार आल्यावर आम्ही घरे देऊ. पुढील सरकारमध्ये ३ कोटी घरे बांधू. ही मोदींची हमी आहे.