पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट, जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या 109 जाती केल्या जाहीर

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत 109 उच्च उत्पादन देणाऱ्या, हवामान-लवचिक आणि जैव-लवचिक वाणांचे प्रकाशन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी शेतकरी आणि शास्त्रज्ञांशीही चर्चा केली.

नवीन पिकांच्या वाणांच्या महत्त्वावर चर्चा करताना, पंतप्रधान मोदींनी कृषी क्षेत्रात मूल्यवर्धनाच्या महत्त्वावर भर दिला. हे नवीन वाण अतिशय फायदेशीर ठरणार असल्याने खर्च कमी होऊन पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बाजरीचे महत्त्व आणि लोक पौष्टिक आहाराकडे कसे वाटचाल करत आहेत याविषयीही पंतप्रधानांनी चर्चा केली. नैसर्गिक शेतीचे फायदे आणि सेंद्रिय शेतीकडे सर्वसामान्यांच्या वाढत्या मागणीबद्दलही त्यांनी सांगितले. सेंद्रिय खाद्यपदार्थांकडे लोकांची मागणी वाढत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे शेतकऱ्यांनी कौतुक केले.

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 61 पिकांच्या 109 जातींमध्ये 34 शेतातील पिके आणि 27 बागायती पिकांचा समावेश आहे.

बाजरी, चारा पिके, तेलबिया, कडधान्ये, ऊस, कापूस, फायबर आणि इतर संभाव्य पिकांसह विविध तृणधान्यांचे बियाणे जाहीर करण्यात आले. तसेच बागायती पिकांमध्ये विविध प्रकारची फळे, भाजीपाला, लागवड पिके, कंद पिके, मसाले, फुले व औषधी पिके जाहीर करण्यात आले आहेत.