Prime Minister’s visit : लखपती दीदींच्या सेवेसाठी २१२९ एसटी बसेसचे नियोजन

जळगाव : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवार २५ रोजी ‘लखपती दीदी’ या महिला सक्षमीकरणांतर्ग होणाऱ्या मेळाव्यासाठी येणार आहेत. या कार्यक्रमात जिल्ह्यातील महिला भगीनींना उपस्थित राहता यावे, यासाठी परिवहन महामंडळाकडून सुमारे २ हजार १२९ बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली.

देशाचे पंतप्रधान मोदी हे २५ ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या महिला सक्षमीकरणांतर्गत आयोजीत लखपती दीदी कार्यक्रमासाठी महिला भगीनींना उपस्थित रहाता यावे, यासाठी परिवहन महामंडळाकडून विविध आगारातील सुमारे २ हजार १२९ एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. लखपती दीदी हा ऐतिहासिक कार्यक्रम असून या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील ११ आगारातील सुमारे ८७६ बसेस असून ५०४ बसेस महिला भगिनीसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आदी जिल्ह्यांच्या आगारातून सुमारे १ हजार ८२५ बसेस मागविण्यात आल्या आहेत.

२५ रोजी होणाऱ्या लखपती दिदी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील ११ आगारातील ५०४ बसेसमधून महिला भगींनीच्या ने आण करण्यासाठी आहेत. यात ग्रामीण मार्गावर कमी फेऱ्या होणार असून प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही याची काळजी घेत ग्रामीण मार्गावर जाणाऱ्या तसेच शालेय वेळेवर असणाऱ्या बसेसच्या फेन्या बंद राहणार असल्याचेही जगनोर यांनी सांगितले. या दौऱ्यासाठी दिल्ली येथून वरिष्ठ अधिकारी स्तरावरील सुमारे १०० महिला अधिकारी, राज्याचे ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले हे देखील जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी विमानतळ परिसरासह व सभास्थळाची पूर्वतयारी पाहणी करीत आढावा घेतला.

विविध पातळ्यावरील उच्च पदस्थ अधिकारी जिल्ह्यात दाखल
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षा व्यवस्था तसेच अन्य यंत्रणां सुव्यस्थित आहेत किंवा नाहीत याची कठोर तपासणी केली जात असून रविवार २५ रोजी शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच ठिकठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. चौकाचौकातील सिग्नल यंत्रणेसह सिसीटीव्ही कॅमेरे देखील कार्यान्वित करण्यात आले आहेत.