कृषी महोत्सवाचा नावाने तिकीट छापून वसुली; अजित पवारांचा आरोप, फडणवीस म्हणाले..

सिल्लोड येथील कृषी महोत्सवावरुन अजित पवार यांनी सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कृषी महोत्सवाचा नावाने तिकीट छापून वसुली करण्यात येत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. या आरोपाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी असा प्रकार घडला असेल तर नक्कीच कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.

अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात होत असलेल्या ‘सिल्लोड कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. यासाठी तिकीट छापण्यात आले असून, त्यासाठी काही दरही ठरवण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यात 10 पेक्षा अधिक तालुके आहेत त्या ठिकाणी प्लॅटिनम प्रवेशिका देण्यात आली असून, त्यासाठी 25 हजार रुपये दर ठरवण्यात आला आहे. तर इतर प्रवेशिकांचे पाच हजार, साडेसात हजार आणि दहा हजार दर ठरवण्यात आले असून, याचे माझाकडे पुरावे असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार यांच्या आरोपाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सिल्लोडबाबत ज्या काही बातम्या आल्या आहेत त्याची गंभीर दखल घेतली जाईल. तसेच या संदर्भात कुठेही असे चालले असेल तर त्याच्यावर कडक कारवाई सरकार करेल अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.