जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याची अंतर्गत वादातून हत्या

जळगाव : जळगाव जिल्हा कारागृहातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. खून प्रकरणात जळगाव कारागृहात कैदी असलेल्या आरोपीची अंतर्गत वादातून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आलीय. मोहसीन असगर खान (वय ३४) असे हत्या झालेल्या कैद्याचे नाव असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, ऑक्टोबर २०१९ मध्ये भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात ( वय ५५) यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर एका टोळक्याने हल्ला केला होता. यात रवींद्र खरात यांच्यासह एकूण पाच जणांचे बळी गेल्याने परिसर हादरला होता पुर्व वैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून ते जळगाव कारागृहात आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी मोहसीन असगर खान याचे दुसरा आरोपी याच्याशी काल दुपारी भांडण झाले. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. या अनुषंगाने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसर्‍या आरोपीने मोहसीन असगर खान याच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. असगरला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले.