तरुण भारत लाईव्ह । प्रा. डॉ. अरुणा धाडे । प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग क्षिप्रा नदी स्थित उज्जैन येथे विराजमान आहे. भारत भेटी दरम्यान उज्जैनच्या महाकालेश्वरचं पावित्र्य जवळून बघता आलं. इथे फिरताना इथल्या कणाकणात भगवान शंकराचा आशीर्वाद असल्याची अनुभूती सतत होत होती.
उज्जैनच्या महाकालेश्वर बाबतीत बर्याच आख्यायिका प्रसिद्ध आहेत. असे मानले जाते की, उज्जयिनी नगरीचा केवळ एकच राजाधिराज आहे आणि तो म्हणजे भूतभावन महाकालेश्वर! त्याच्याशिवाय कोणीही ह्या पदावर असणं काळाला मान्य नाही. म्हणूनच आजपर्यंत अनेक राजे महाराजे इथे येवून पण सर्वसामान्य भक्ताप्रमाणेच महाकालेश्वरचं दर्शन घेतलं. आणखी एक विशेष गोष्ट सांगितली जाते की या मंदिराच्या शिखरावरुन विषव वृत्तीय ‘कर्क रेखा’ जाते. त्यामुळे या स्थानाला पृथ्वीची नाभीदेखील मानलं जातं. याच धारणेतून महाकालेश्वरला ‘पृथ्वीचा अधिपती’ आहे.
दर्शनासाठी मंदिरात प्रवेश केल्यापासूनच मंदिरातील दैवीय आभा निश्चितच जाणवत होती. सभोवती प्रसन्नता होती. मंदिर गाभार्यात सौम्य सुगंध दरवळत होता. फुलपुष्प, धूप, दीप, अगरबत्तींचा सुवास सर्वत्र व्याप्त होता. ‘नमः शिवाय’ जपाचा मंद मंंद स्वर कानी गुंजाळत होता. छोट्या-मोठ्या घंटांचा नाद घुमत होता. पुजार्यांच्या विधीवत पूजनात ह्या सगळ्यांचा ध्वनी मिसळून एक पवित्र वातावरण निर्माण झालं होतं. अशावेळी सर्व सांसारिक इच्छांपासून दूर जात नकळत देवाधिदेव महादेवाशी आपण एकरूप होऊन जातो. ईश्वरीय तत्त्वाशी जोडले जातो.
गर्भगृहात व्यापून असणारी सूक्ष्म स्पंदने महादेवाच्या निर्विकार रुपाचे अस्तित्व जाणवून देत होती.गर्भगृहात भगवान महाकालेश्वराचे जगातील एकमेव दक्षिणाभिमुख विशाल शिवलिंग आहे. सोबत देवी पार्वती, श्री गणेश आणि कार्तिकेय यांच्या सुंदर मूर्ती आहेत. गाभार्यात अखंड तेवणारा ‘नंदा दीप’ आहे. गर्भगृहासमोरील विशाल सभामंडपात नंदीची भव्य मूर्ती आहे. या दालनात हजारो भाविक शिवपूजन करतात.
इतिहासकालीन नोंदीनुसार अठराव्या शतकात प्रथम बाजीराव पेशवा यांनी महाकाल मंदिराचे पुनर्निर्माण करून उज्जैनचे हरवलेले वैभव परत मिळवून दिले. जे की, आक्रमणकर्त्यांनी नष्ट केले होते. याच काळात मराठ्यांनी दोन महत्त्वपूर्ण कार्य केले. पहिले कार्य ‘ज्योतिर्लिंगाची पुनर्स्थापना’ आणि दुसरे ‘सिंहस्थपर्व स्नान’ परंपरा पुन्हा रुजवली, ज्यामुळे सामान्य जनतेत धर्माचे पुनरुत्थान झाले.
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग स्थान हे तंत्रमंत्र विद्येसाठी विशेष ओळखले जाते. इथे भगवे वस्त्रधारी साधूंची वेगवेगळ्या अवस्थेतील रुपे पाहणे खूप मनोरंजक होते! एक गोष्ट आहे की भगवान शिव सर्वांना प्रश्रय देणारे देवता आहेत. पहाटे चार ते सहा या वेळेत होणारी भोलेनाथची ‘भस्म आरती’ हे महाकाल मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण आहे. यात सहभागी होण्यासाठी शिवभक्त मोठी आस लावून दूरवरून येतात.
महाकाल मंदिरात वर्षभर उत्सवाचे वातावरण असले तरी महाशिवरात्रीपर्यंत ‘शिव नवरात्री’ विशेष साजरी केली जाते. उज्जैनमध्ये महाकालची प्रतिष्ठा अनादी काळापासून आहे आणि आजही कायम आहे. पुराण मान्यतेनुसार भगवान शिवाच्या मात्र ’दर्शना’नेच मोक्ष प्राप्ती होते. अर्थात हे ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे.
नुुकताच राष्ट्रार्पित करण्यात आलेला सुसज्जीत ‘उज्जैन कॉरिडॉर’ पुराणात उल्लेखलेल्या भगवान शिवाच्या अनेक कथांना कलात्मक पद्धतीने शिल्पकलेच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकारण्याचा सुंदर प्रयास आहे.