तरुण भारत लाईव्ह । ३ सप्टेंबर २०२३। महाराष्ट्रात आता प्रो-गोविंदा स्पर्धा रंगणार आहे. यामुळे राज्यभरातील गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवण्यासाठी गोविंदांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी अभिनेता अभिषेक बच्चनला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनवण्यात आल्याने, या स्पर्धेचे आकर्षण अधिकच वाढले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शासन आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रो-गोविंदा 2023’ या स्पर्धेला शुभेच्छा देत, स्पर्धेत सहभागी झालेल्या गोविंदांशी संवाद साधून उत्साह वाढवला तसेच, प्रो-कबड्डी प्रमाणेच यावर्षीपासून प्रो-गोविंदा स्पर्धा राज्यात सुरू झाली असून, आपल्या मातीमधील या खेळाला सर्वदूर पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. वरळीत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या प्रो-गोविंदा स्पर्धेसाठी यापुढे बॉलिवूड अभिनेते अभिषेक बच्चन ब्रॅण्ड अॅम्बेसिडर असतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केले.