हत्तीरोगबाधित दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू ; ‘जीएमसी’मध्ये तिघांची झाली तपासणी

जळगाव  : दिव्यांग आयुक्त, पुणे यांनी केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे व राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या सूचनेप्रमाणे आता हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरोग असणाऱ्या रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबाबत बुधवारी दि. २४ जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग विभागामध्ये चाळीसगाव येथील तिघांची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली.

दिव्यांग आयुक्त, पुणे यांनी केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे व राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयातर्फे सहसंचालकांनी विविध विभागांना याबाबत दि. ७ मे रोजी पत्र दिले आहे. या पत्रानुसार जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांना जळगाव जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. टी. एस. देशमुख यांनी पत्र देऊन सदरहू हत्तीरोग रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत माहिती दिली आहे.

या अनुषंगाने बुधवार दि. २४ जुलै रोजी चाळीसगाव तालुक्यातील सुरेखा हिरामण गांगुर्डे, शोभा यमाजी दहीहंडे आणि अहमद शेख बुढन शेख यांची वैद्यकीय तपासणी सहायक प्रा.डॉ. समीर चौधरी यांनी केली. त्यानुसार दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता तथा दिव्यांग बोर्डाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक तथा दिव्यांग बोर्डाचे सचिव डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रा. डॉ. समीर चौधरी यांनी केली. तपासणीसाठी दिव्यांग बोर्डातील कर्मचारी विशाल दळवी, चेतन निकम, दत्तात्रय पवार यांच्यासह विश्वजीत चौधरी, विशाल पाटील, प्रकाश पाटील आदींनी सहकार्य केले.

अशी होईल कार्यवाही

हत्तीरोग असणाऱ्या रुग्णांना कार्यवाही इतर दिव्यांग रुग्णांप्रमाणे केली जाणार आहे. आधी ऑनलाइन फार्म भरून कूपन घ्यावे लागते. कूपन म्हणजे अपॉइंटमेंट मिळते. त्यामुळे दिव्यांग बांधवांना त्यांच्या तपासणीची तारीख आणि वेळ मिळते. त्या तारखेला त्यांची पूर्ण तपासणी होते. डॉक्टर संबंधिताला दिव्यांगाच्या प्रकार, तीव्रतेनुसार प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही करतात. ते दिव्यांग बोर्डात जमा झाल्यानंतर संबंधिताला प्रमाणपत्र तयार झाल्याचा संदेश येतो. प्रमाणपत्र ऑनलाइन मिळते. ते त्यांना डाउनलोड करून प्रिंट काढता येते.