नंदुरबार : येथील जी.टी. पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम यांनी मतदान जागृतीसाठी अहिराणी बोली भाषेत तयार केलेले व्हिडिओ समाज माध्यमात सध्या चांगलेच व्हायरल होत असून त्यांना पसंतीही मिळत आहे.
भारत सरकार आणि राज्य निवडणूक आयोग सध्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आप आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नाला हातभार लावावा म्हणून जी. टी. पाटील महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. माधव कदम यांनी मतदानाविषयीची जनजागृती करण्यासाठी आणि वेळात वेळ काढून आपण मतदान कराच, तो आपला नैतिक अधिकार आहे. हे सांगण्यासाठी खानदेशातील अहिराणी बोली भाषेचा वापर केला आहे.
प्रा. डॉ. कदम यांनी समाज माध्यमांवर तीन वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. यात पाऊस वेळेवर येत नाही म्हणून गुराढोरांच्या काळजीसाठी व्याहीकडून चारा येतो, पण तो चारा भरण्यात मग्न न राहता मतदानाची आठवण ठेवा आणि मतदान करायला जा… चारा आज नाहीतर उद्या भरला जाईल पण मतदानाच्या दिवशी मतदान केलेच पाहिजे, अशी आठवण करून देणारा शेतकऱ्यांचा संवाद असलेला एक व्हिडिओ आहे.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये दोन गावकऱ्यांचा ग्रामीण बोली भाषेतला संवाद असून सध्या शेंगा उपडण्याचा व्यवसाय सुरू आहे. शेतकरी सकाळी सकाळीच आपापल्या कामासाठी शेतात निघून जातो. जेमतेम मजूर मिळतेय म्हणून शेंगा उपडवण्याची त्याला घाई आहे. पण एक शेतकरी दुसऱ्याला तुझं काम कर, पण मतदानाच्या दिवशी तुही मतदान कर आणि तुझ्या शेतातल्या मजुरांनाही मतदान करायला प्रवृत्त कर, असा सल्ला देणारा प्रेरणादायी व्हिडिओ तयार केला आहे.
तिसऱ्या व्हिडिओमध्ये ग्रामीण भागातल्या दोन महिलांचा संवाद घेतला असून एक महिला दुसऱ्या महिलेला विचारते, दोन-तीन दिवसापासून तू दिसतंच नाही. इतकी काय कामात मग्न आहे. तेव्हा ती म्हणते कडक उन्हाळा असल्यामुळे घराबाहेर जाता येत नाही. त्यामुळे घरातील सगळी कामं आवरून घेते आणि घरात नुकतच लग्न झाल्यामुळे घरातला पसारा चांगलाच वाढला आहे. ते सगळं आवरत असल्यामुळे बोलायलाही वेळ नाही, अशी टी म्हणते. तेव्हा दुसरी महिला हे सगळं आवर पण 13 तारखेला मतदान आहे याची तुला आठवण करून देते आणि गेल्या मतदानाच्या वेळेस आपण सोबत मतदान करायला गेलो होतो, याही वेळेस सोबत मतदान करायचे आहे असा आग्रह करते.
एकूणच हे तिन्ही व्हिडिओ खानदेशातील बोलीभाषेत असल्यामुळे सगळ्यांनाच पसंतीचे ठरत आहेत. समाज माध्यमावर लोकप्रिय होत असलेल्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरू आहे.