भुसावळ : भुसावळचे उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने जामनेर रोडवरील साईमंदिराजवळील एका गोदामातून राज्यात प्रतिबंधित असलेला पाच लाख २० हजारांचा विमल गुटखा जप्त केल्याने शहरातील गुटखा तस्कर हादरले आहे. संशयित आरोपी उमेश भगवान पाटील (वय ३०, लहान मारोती मंदिराजवळ, तापी नगर, भुसावळ) व किशोर अघीचा (सिंधी कॉलनी, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल पोलीस करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जामनेर रोडवरील साई मंदिराजवळील एका गोदामात गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना मिळाली होती. याबाबत त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर सोमवारी सकाळी पथकाने छापेमारी केली. यावेळी संशयीत उमेश पाटील यास गोदामात गुटख्याच्या साठ्यासह पकडण्यात आले. संशयीताने गुटख्याचा साठा हा किशोर अघीचा यांचा असल्याचे सांगितले. यावेळी तीन लाखांचा विमल पानमसाला एक लाख ६० हजारांचा केसरयुक्त पानमसाला, ६० हजारांची केसरयुक्त तंबाखू मिळून पाच लाख २० हजारांचा साठा जप्त केला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नंदकिशोर सोनवणे, अनिल झुंजारराव, स्वप्नील पाटील, श्रीकांत ठाकूर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.