तरुण भारत लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । आजकालच्या जगात लबाडीचे प्रमाण वाढत असतानाच बस आगाराच्या कर्मचाऱ्यांनी आदर्श उभा केला आहे. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील सराफ रोहीत सोनार हे पाचोरा आगाराच्या बसमध्ये ६५ हजार किमतीची एक किलो चांदीची बॅग विसरले. आगार कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे ती बॅग सापडली असून सराफास परत देण्यात आली आहे. सराफ सोनार यांनी समाधान व्यक्त केले.
पाचोरा आगाराच्या जळगाव- पाचोरा (एमएच २०, बीएल १८३६) बसमधून सराफ रोहीत सोनार हे प्रवास करीत होते. बसमधून उतरताना ६५ हजार रुपये किमतीची एक किलो चांदी असलेली बॅग ते बसमध्येच विसरले. घरी येत असताना बॅग बसमध्येच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला मित्र गोलू पाटील यास या संदर्भात माहिती दिली. गोलू पाटील यांनी पाचोरा आगारातील कर्मचारी प्रयास पाटील यांना याबाबत माहिती दिल्यानंतर प्रयास पाटील यांनी अतिशय तत्परतेने सर्व सूत्र हलविली व ही बस आगारात तपासली असता त्यांना बसमध्ये बॅग आढळली.
त्यात एक किलो चांदी होती. त्यांनी सराफ रोहित सोनार यांना आगारात बोलवून योग्य ती खात्री करून घेतल्यानंतर त्यांना बॅग परत दिली. या वेळी दिनकर पाटील, राहुल पाटील, गुलाब पाटील, गोलू पाटील उपस्थित होते.