Parbhani violence: परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या प्रकारामुळे संतप्त जमाव आक्रमक बनला, ज्यामुळे हिंसाचार उफाळून आला. यानंतर अनेक भागात जाळपोळ करण्यात आली. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडण्यात आल्या. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सिमेंटपासून तयार करण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची माथेफिरूने विटंबना केली .
त्याचवेळी प्रत्यक्षदर्शींनी त्याला बेदम मारहाण केली. पोलिसांनी जमावाला बाजूला सारत त्या माथेफिरुस ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत जमाव घटनास्थळी ठाण मांडून होता. यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. संतप्त जमावाने या परिसरात आलेल्या एका ट्रक आणि बसच्या काचा फोडल्या.
शहराच्या मध्यवर्ती भागात शेकडो वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. मात्र, पोलीस या प्रकारांसमोर निष्प्रभ ठरले. अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाने कोणतीही जमावबंदी अथवा अन्य आदेश लागू केलेला नाही. सध्या जमाव मुख्य चौकांवर ठाण मांडून आहे. त्यामुळे शहरात मोठे तणावाची वातावरण निर्माण झाले आहे.
‘बंद’चे आवाहन
या घटनेच्या निषेधार्थ आज बुधवारी (ता. ११) परभणीत ‘बंद’चे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले. आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष सुरू झाला. रेल्वे स्टेशन रोड परिसरात जमावाने तीन ठिकाणी बाहेर ठेवलेले पाइप पेटवून दिले. यामुळे परिसरात अंधार निर्माण करण्यासाठी वीज पुरवठाही बंद करण्यात आला. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, मात्र आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करून परिस्थिती आणखीनच चिघळवली.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. “कोणीही अफवा पसरवू नये किंवा त्यावर विश्वास ठेवू नये. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी नागरिकांची आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जमाबंदीचे आदेश लागू
परभणी बंदच्या हिंसक वळणावर परभणीचे जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शहरात जमाबंदीचे आदेश काढले आहे. परीसारत 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. आज दुपारी 1 वाजेपासून ते पुढील आदेश येईपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार आहे. तसेच सर्व टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र, ध्वनीक्षेपके आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे ही आदेश देण्यात आले आहे.