प्रांताधिकाऱ्यांची सरप्राईज व्हिजीट भुसावळात १०कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटिसा

 भुसावळ : येथील पालिकेवर ‘प्रशासकराज’ असताना काही कर्मचारी गैरहजर राहत असल्याची तक्रारी वाढल्यानंतर सोमवारी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी सरप्राईज व्हिजीट दिली. सकाळी 10.15 वाजेनंतरही कामावर हजर नसलेल्या 10 कर्मचार्‍यांना तातडीने कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. 12 कर्मचारी खात्यांतर्गत परीक्षेसाठी रजेवर असल्याचे आढळले असून प्रांतांच्या कारवाईने कर्मचार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.  पालिकेत कर्मचारी उपस्थित राहत नसल्याची ओरड वाढल्याने प्रांताधिकारी तथा पालिकेचे प्रशासक जितेंद्र पाटील यांनी सोमवारी सकाळी सव्वादहा वाजता पालिकेच्या प्रशासकीय कार्यालयात सरप्राईज व्हिजीट दिली.  प्रांताधिकारी पाटील प्रवेशव्दाराच शिरताच त्यांनी मुख्य प्रवेशव्दार व आतील दरवाजा बंद करण्याच्या सूचना दिल्या. उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांची तसेच अनुपस्थित कर्मचार्‍यांची माहिती घेतली. यात 10 कर्मचारी गैरहजर आढळले तर 12 कर्मचारी खात्यांतर्गत परीक्षेसाठी बाहेर असल्याची माहिती मिळाली. प्रांताधिकारी पाटील यांनी गैरहजर असलेल्या कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे पालिकेत खळबळ उडाली.  दरम्यान, गैरहजर कर्मचार्‍यांपैकी सात कर्मचारी झोनल अधिकारी म्हणून वॉर्डात कार्यरत असल्याची माहिती असून त्याबाबत त्यांच्याकडे जीपीएस लोकेशनही असल्याचे सूत्रांनी सांगितले