Sant Tukaram Beej 2025: वारकरी संत परंपरेतील महत्त्वाचे संत तुकाराम महाराज यांचा तुकाराम बीज सोहळा 14 ते 16 मार्च दरम्यान होत आहे. या सोहळ्यानिमित्त पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. या सोहळ्यासाठी येणारे भाविक इंद्रायणी नदीत स्नान करतात आणि हेच पाणी पवित्र मानून ग्रहण करतात. मात्र, यंदा नदीतील पाणी पिण्यास तसेच स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या बाबत जिल्हाधिकारी यांनी नुकतेच आदेश जारी केले आहेत.
या आदेशात इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास अपायकारक असल्याचे म्हटले आहे. या सोहाळ्यासाठी इंद्रायणी नदीच्या तीरावर वारकऱ्यांची मोठी गर्दी होते. या नदीत स्नान आणि नदीचे पाणी ग्रहण करण्यास विशेष धार्मिक महत्त्व आहे. मात्र, इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवरील पाणी पिण्यास अथवा स्वयंपाकासाठी वापरण्यास योग्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नदीतील पाण्याची गुणवत्ता, येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या आणि इतर बाबी लक्षात घेता. नदीतील पाणी अधिक प्रमाणात दूषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी करण्यात आले आहे.
पिण्यासाठी सार्वजनिक नळाचे पाणी वापरण्याचे आवाहन
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करत हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे म्हटले आहे. वारकऱ्यांनी इंद्रायणीचे पाणी केवळ स्नान, भांडी धुणे किंवा इतर आवश्यक गोष्टींसाठी वापरावे. मात्र, पिण्यासाठी हे पाणी वापरू नये. पिण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या नळांचे पाणीच वापरावे, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे. यासह इंद्रायणी नदीच्या पाण्याचा उपयोग करताना कोणत्याही प्रकारे ते दूषित होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. विशेषतः, नदीमध्ये कपडे धुणे किंवा अन्य दूषित करणारी कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे.