Pushpak Express Accident Update : एक बोंब, ३५ ते ४० प्रवाशांनी धावत्या गाडीतून मारल्या उड्या, मृतांचा अधिकृतरित्या आकडा काय?

जळगाव : परधाडे रेल्वे स्थानकाजवळ आज, २२ जानेवारी रोजी सायंकाळी मोठी रेल्वे दुर्घटना घडली. लखनऊहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी आग लागल्याच्या अफवेमुळे धावत्या गाडीतून उड्या मारल्या. दुर्दैवाने, त्याचवेळी बाजूच्या रुळांवरून जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने (बेंगळुरू-नवी दिल्ली) या प्रवाशांना चिरडल्याने या अपघातात सात ते आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुष्पक एक्स्प्रेसमध्ये अचानक ब्रेक लावल्याने ठिणग्या उडाल्या आणि आग लागल्याची भीती प्रवाशांमध्ये पसरली. या घाबरलेल्या प्रवाशांपैकी ३५ ते ४० जणांनी गाडीतून उड्या मारल्या. यातून काही प्रवाशांना कर्नाटक एक्स्प्रेसने चिरडल्याने हा भीषण अपघात घडला.

या दुर्घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा अधिकृतरित्या जाहीर झालेला नसला तरी सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी मंत्री गिरीश महाजन व पोलीस अधीक्षकांना तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती हाताळण्याचे निर्देश दिले.

घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन, पोलीस अधीक्षक व इतर अधिकारी दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसेच, पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे तर कर्नाटक एक्स्प्रेस नवी दिल्लीकडे रवाना करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाची भूमिका

रेल्वे प्रशासनाकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. या दुर्घटनेने रेल्वे प्रशासनासमोर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.