Pushpak Express Accident Update : ८ ते १० प्रवाशांचा मृत्यूची शक्यता, खासदार स्मिता वाघ घटनास्थळी दाखल

जळगाव : पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांमधून अचानक आगीच्या ठिणग्या उडाल्या. यामुळे प्रवाशांमध्ये गाडीत आग लागल्याची अफवा पसरली. घाबरलेल्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. त्याच वेळी समोरून येणाऱ्या नवी दिल्लीहून बंगळुरूकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना चिरडल्याने ८ ते १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

परधाडे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक लावल्याने चाकांमधून ठिणग्या उडाल्या. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि आगीची अफवा पसरली. घाबरलेल्या अनेक प्रवाशांनी गाडीतून उड्या मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच दरम्यान समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाशांना धडक दिली.

हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड

या भीषण अपघातात ८ ते १० जण ठार झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अपघातग्रस्तांपैकी काही जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

प्रशासनाची तत्परता

घटनेची माहिती मिळताच जळगावच्या खासदार स्मिता वाघ घटनास्थळी पोहोचल्या. तसेच, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला सर्वतोपरी मदत देण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : Sharon Raj murder case : विश्वास ठेवावा तर कुणावर ? प्रेयसीनेच केला घात, अखेर फाशीची शिक्षा

या घटनेने एकच खळबळ उडाली असून,  काही प्रत्यक्षदर्शींनी रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याचे सांगितले. मात्र, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.

सावधानतेचे आवाहन

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना रेल्वे गाड्यांमधून उड्या न मारण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे.