जळगाव : परधाडे येथील पुष्पक एक्सप्रेसच्या भीषण रेल्वे अपघाताने अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेत नेपाळ येथील कमला भंडारी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह नेण्याकरिता रुग्णवाहिका मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र ऐनवेळी प्रशासनाने नकार दिल्याने संतप्त नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे काही काळ तणाव आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. त्यानंतर मयत कमला भंडारी यांचा मृतदेह नेपाळपर्यंत नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली.
मुलाचा आक्रोश आणि प्रशासनाची तत्परता
कमला भंडारी यांच्या मुलाने, तपेंद्र भंडारी यांनी, “सरकारकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या. साधी रुग्णवाहिकादेखील मिळू शकत नाही का?” असा आर्त सवाल करत मृतदेह नेण्यास नकार दिला. “रुग्णवाहिका दिली नाही, तर मृतदेह घेऊन जाणार नाही,” असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. त्यानंतर मयत कमला भंडारी यांचा मृतदेह नेपाळपर्यंत नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली.
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह रवाना
घटनेनंतर तब्बल २४ तासांनी शवविच्छेदन आणि अन्य कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्यात आला. प्रशासनाने थेट गावापर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, तसेच दोन पोलीस कर्मचारी सोबत पाठवले. या मदतीमुळे नातेवाईकांना काहीसा दिलासा मिळाला.
दरम्यान, पुष्पक एक्सप्रेसच्या अपघाताने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे पीडित कुटुंबाला थोडा आधार मिळाल्याचे दिसून आले.