जळगाव : परधाडे येथे काल झालेल्या पुष्पक एक्सप्रेस दुर्घटनेतील जखमी प्रवाशांसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय जीवनवाहिनी ठरले आहे. या दुर्घटनेनंतर जखमींना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, रुग्णालयाच्या संचालिका डॉ. केतकी पाटील आणि त्यांची टीम सरसावली.
गंभीर जखमींचे तातडीने उपचार
दुर्घटनेत गंभीर दुखापत झालेल्या ७ वर्षीय मंजू परिहार आणि धर्माशान सौदे यांना मध्यरात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश खुरपे आणि व्यवस्थापक आशिष भिरूड यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ डॉक्टरांची टीम तयार ठेवण्यात आली. कुत्रिम श्वासोश्वास यंत्रणा आणि इतर अत्याधुनिक सुविधा वापरून या रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले.
संपूर्ण वैद्यकीय टीम सज्ज
अबू मोहम्मद, दीपक थापा, उत्तम हरजन, हसन अली, नकिम अन्सारी, विजयकुमार गौतम, मोहम्मद अली यांसह अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किरकोळ दुखापत झालेल्या प्रवाशांनाही तातडीने वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली.
सेवाभावी कामगिरी
माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी सर्व रुग्णांवर सेवाभावी दृष्टिकोनातून उपचार करण्याचे आदेश दिले. सर्व कर्मचाऱ्यांनी समर्पण भावनेने जखमी प्रवाशांना मदत केली. हे रुग्णालय जखमींसाठी खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी ठरले आहे.
भाजप नेत्यांनी घेतली विचारपूस
भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील, भाजपा प्रदेश सचिव अजय भोळे, भाजयुमो जिल्हा चिटणीस सुमित बऱ्हाटे, आणि भाजपा भुसावळ उपाध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची आस्थेवाईक विचारपूस केली. डॉ. केतकीताईंनी उपचार प्रक्रियेचा आढावा घेत तज्ञ डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
संपर्कासाठी हेल्पलाईन नंबर
रुग्णांची चौकशी करण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाने ९३७३३५०००९ हा संपर्क क्रमांक जाहीर केला आहे. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या या तात्काळ प्रतिसादामुळे गंभीर जखमींना दिलासा मिळाला असून रुग्णालयाने पुन्हा एकदा आपली सामाजिक जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.