जळगाव : पाचोरा जवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या भयानक रेल्वे अपघाताने राज्यभरात खळबळ उडाली आहे. पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक दाबल्यामुळे चाकांच्या घर्षणातून धूर आला आणि आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून रुळांवर उड्या घेतल्या. याच दरम्यान समोरून येणाऱ्या एक्सप्रेसने काही प्रवाशांना चिरडल्याने सात ते आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेविषयी तीव्र दुःख व्यक्त करत एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले,
“पाचोरा नजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना मनाला वेदना देणारी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले आहेत. जिल्हाधिकारी काही वेळात पोहोचतील. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने काम करत असून जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.”
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, ८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून, सामान्य रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयांना उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. आपत्कालीन साधनं जसे की ग्लासकटर आणि फ्लडलाईट्स तैनात करण्यात आले आहेत. “मी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, आवश्यक ती सर्व मदत तत्काळ दिली जाईल,” असेही त्यांनी नमूद केले.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या दुर्दैवी घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत म्हटले की,
“पाचोरा येथे घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. या अपघातामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, तर जखमी प्रवाश्यांना उपचारासाठी तातडीने सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी,” अशी मागणी त्यांनी केली. वडेट्टीवार यांनी रेल्वे प्रशासनाला या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली असून भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
जखमींवर तातडीने उपचार सुरू
जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना पाचोरा ग्रामीण रुग्णालय तसेच इतर खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी प्रशासनाच्या सर्व तुकड्या आणि मदत यंत्रणा सक्रिय असून, रेल्वे अपघाताची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले आहे.