मित्रांवर काळाचा घाला! मुंबईहुन घरी परतत असताना अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

पारोळा : कॅप्सूल टँकर व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पालिका अभियंता आणि डॉक्टर जागीच ठार झाले. ही दुर्घटना पारोळ्यानजीक विचखेडा गावाजवळ सोमवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. अभियंता कुणाल देविदास सौपुरे (33, रा. गोंधळ वाडा, पारोळा ),  डॉ. नीलेश भीमराव मंगळे (34 रा. डी. डी. नगर, पारोळा) हे ठार झाले असून (संदीप पवार वय 37, रा.आर. एल. नगर, पारोळा) हे जखमी झाले आहेत.
शनिवार, रविवार सुटी असल्याने तिघे मित्र मुंबई येथे खासगी कामानिमित्त गेले होते. परतीचा प्रवास करत असताना पारोळ्यापासून काही अंतरावर असतानाच काळाने घाला घातला. या अपघातामुळे गावावर शोककळा पसरली आहे.कुणाल सौपूरे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, व दोन वर्षाची लहान मुलगी आहे. डॉ.निलेश मंगळे हा उत्तराखंड येथे एम एस अर्थो स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणून कार्यरत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भावंडे, पत्नी व दोन महिन्याचे जुळे दोन मुले आहेत.दरम्यान कुटीर रुग्णालयाला बघ्याच्या गर्दीने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.या घटनेबाबत पोलिसात सुनील वसंत बारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.नि. रामदास वाकोडे करीत आहेत.
..अन् घर बनविण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले
पारोळा शहरातील चोरवड रस्त्यावरील छोरिया फॉर्च्युन सिटीमध्ये प्लॉट घेऊन घर बनविण्याचे कुणाल सौपुरे यांचे स्वप्न होते.त्यादृष्टीने त्यांनी संबंधिताशी बोलणी करून प्लॉट घेण्याचे दृष्टीने तयारीलाही लागले होते.मात्र या दुदैवी घटनेमुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.