अहिल्यानगर : महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सरकार सोहळा आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर मधील राहता शहरातील नागरिकांकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आमदार आमोल खताळ यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्काराला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता कधी देणार याबाबत त्यांनी सांगितलं.
लाडक्या बहिणी आता कारभारी झाल्या आहेत. विरोधक म्हणायचे तुमची योजना बंद होणार आहे. योजना बंद झाली का? असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरिकांना विचारला. यावर नागरिकांकडून प्रतिसाद येत नसल्यानं चिंता करु नका मी पैसे मागणार नाही, चालू आहे की बंद आहे याचं उत्तर द्या, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
आता जानेवारी महिन्याचा हप्ता येईल. मार्च महिन्यातील बजेटनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता २१०० रुपये होणार असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. महायुती सरकार लाडक्या बहिणींना कधी दूर करणार नाही हे तुम्हाला आवर्जून सांगितलं पाहिजे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात विखे पाटलांनी लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य केलं आहे.
लाडक्या बहिणींना जानेवारीची रक्कम लवकरच
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीपूर्वीपासून मिळण्यास सुरु होईल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. राज्य सरकारनं जानेवारी महिन्याच्या लाभाच्या वितरणासाठी ३६९० कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे दिले आहेत. डिसेंबर महिन्यात २ कोटी ४७ लाख लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम मिळाली होती.
लाडक्या बहिणींना आतापर्यंत ९००० रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं २०२४ मध्ये जुलै महिन्या पासून सुरु केली आहे. या योजनेचे पहिले दोन हप्ते एकत्रितपणे ऑगस्ट महिन्यात देण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर पर्यंत एकूण ६ हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आली. म्हणजेच १५०० रुपयांप्रमाणं महिलांना एकूण ९००० हजार रुपये मिळाले आहेत. महायुती सरकारनं निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा लागली होती.