राहुल गांधी, काँग्रेस पक्ष आणि संसदेचे कामकाज

दिल्ली वार्तापत्र….

 

श्यामकांत जहागीरदार

 

संसदेच्या अर्थसंकल्पीय Rahul Gandhi अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्यातील पहिल्या सात दिवसांचे कामकाज दोन्ही सभागृहांतील गोंधळामुळे वाहून गेले. रोज कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांची घोषणाबाजी तसेच त्यांच्या प्रत्युत्तरात सत्ताधारी सदस्यांनी केलेली नारेबाजी यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळाचे वातावरण निर्माण व्हायचे. त्यामुळे दोन्ही सभागृहाच्या पीठासीन अधिकार्‍यांसमोर कामकाज स्थगित करण्याशिवाय पर्याय राहात नव्हता. संसदेत कामकाज न होण्याचा ठपका सत्ताधारी पक्ष विरोधकांवर तर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर ठेवत आहे. यात दोषी कोणीही असले, तरी संसदेच्या दोन्ही सभागृहात कोणतेही कामकाज होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. संसदेच्या कामकाजाबाबत निर्माण झालेली ही कोंडी केव्हा आणि कशी फुटणार, असे प्रश्न मात्र संसदीय लोकशाहीवर प्रेम करणार्‍या देशातील जनतेला पडला आहे.

 

मुळात संसदेतील या पेचप्रसंगासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी Rahul Gandhi जबाबदार असल्याचे सकृतदर्शनी दिसते. लंडनमध्ये जाऊन त्यांनी भारतातील लोकशाहीच्या सद्यस्थितीबाबत नको ती मुक्ताफळे उधळली नसती, तर हा पेचप्रसंग उद्भवलाच नसता. मुळात विरोधी पक्षांचे नेते म्हणून राहुल गांधी यांना मोदी सरकारवर टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे, याबाबत शंका नाही. आपल्या या अधिकाराचा उपयोग राहुल गांधी देशात करीतच आहेत. त्याबाबत त्यांना आतापर्यंत कोणी रोखलेही नाही. मात्र, परदेशात जाऊन भारतातील लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला नाही तर कारण नसताना स्वत:ला आणि काँग्रेस पक्षाला अडचणीत आणले आहे. कोणत्याही कारणाने वा कारणाशिवाय स्वत:ला अडचणीत आणण्यात राहुल गांधी यांचा ‘हात’ कोणी धरू शकत नाही. आतापर्यंत राहुल गांधींना भाजपाच्या सदस्यांनी जेवढे अडचणीत आणले नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळा त्यांनी आपल्या कृतीने आणि विधानाने स्वत:ला अडचणीत आणले. आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यात राहुल गांधी यांनी जे कौशल्य आत्मसात केले, त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये, हे ज्याला समजते, तो यशस्वी राजकारणी होत असतो.

 

राहुल गांधी Rahul Gandhi जवळपास 18 वर्षांपासून राजकारणात आहेत, पण ते यशस्वी का होऊ शकले नाहीत. याचे कारण त्यांच्या या आत्मघाती शैलीत दडले आहे. ‘आ बैल मुझे मार’ची राहुल गांधींची कार्यशैली आहे. राहुल गांधी अनेक वेळा भाबडेपणाचा आव आणत असले, तरी तो त्यांचा भाबडेपणा नसतो, तर खुटीउपाडपणा असतो, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. आता आपण राहुल गांधींनी परदेशातील लोकांसमोर भारतातील लोकशाहीबाबत जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्याचा आढावा घेऊ. भारतातील लोकशाही धोक्यात असती, तर सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाच्या एका नेत्याला परदेशात जाऊ दिले असते का आणि तेथे नको ते बरळू दिले असते का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राहुल गांधींना परदेशात जाता आले, तेथे आपल्या मनातील नको ते विचार व्यक्त करता आले आणि एवढेच नाही तर देशात परत आल्यावरही त्यांच्यावर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, याचा अर्थ आपल्या देशात हुकूमशाही नाही तर लोकशाही आहे, असा काढला तर तो चुकीचा ठरणार नाही. लोकशाहीने आपल्याला संचारस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य दिले आहे. या तिन्ही स्वातंत्र्याचा सदुपयोग वा दुरुपयोग राहुल गांधी गेल्या नऊ वर्षांपासून विनाअडथळा करीत आहेत, हे आपल्याला कसे विसरता येईल. मोदी सरकारवर विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधी अनेक वेळा तुटून पडतात; असंसदीय आणि अश्लाघ्य भाषेत हल्ला चढवतात. अगदी चौकीदार चोर है म्हणतात, तरीसुद्धा त्यांना आतापर्यंत कोणी रोखले नाही. देशात लोकशाही नसती आणि हुकूमशाही असती तर आपल्याला देशाच्या पंतप्रधानांवर असंसदीय आणि अश्लाघ्य भाषेत टीका करता आली असती का, याचा दुसर्‍या कोणी नाही तरी राहुल गांधी यांनीच आपल्या मनाशी विचार करावा. म्हणजे त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर त्यांना आपोआप मिळून जाईल.

 

गेल्या नऊ वर्षांत आपण स्वत: आणि आपल्या मातोश्रींनी पंतप्रधानपदावर असणार्‍या मोदींसाठी कोणकोणते शब्द वापरले, याचे राहुल गांधी Rahul Gandhi यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. तुम्ही आपल्या देशात असताना सरकारवर टीका करण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही; मात्र तुम्ही देशाबाहेर म्हणजे परदेशात असताना तुम्हाला काही संसदीय प्रथा-परंपरांचे पालन करणे आवश्यक असते. देशात असताना तुम्ही पाच पांडव आणि शंभर कौरव अशा दोन पक्षांत विभागले गेले असले, तरी जेव्हा बाह्य शत्रू तुमच्यावर चालून येतो, तेव्हा तुम्ही शंभर आणि पाच नव्हे तर एकत्र येत एकशेपाच व्हायचे असते. राहुल गांधी यांना नेमके याचेच भान राहात नाही वा ते बेभान होऊन जातात आणि स्वत:ला अडचणीत आणतात. मात्र, एवढे होऊनही भाजपाचे सदस्य संसदेत फक्त राहुल गांधींच्या माफीची मागणी करीत असताना राहुल गांधींनी माफी मागून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता. माफी मागितल्यामुळे कोणी लहान होत नसतो, तर त्याच्या मनाचा मोठेपणा दिसून येत असतो. मात्र, काही झाले तरी राहुल गांधी माफी मागणार नाही, असा आडमुठेपणा काँग्रेसचे नेते दाखवत आहेत; याला काय म्हणावे, ते समजत नाही. राहुल गांधींनीही या प्रकरणात कारण नसताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना ओढण्याचे काही कारण नव्हते. माफी मागायला मी काही स्वातंत्र्यवीर नाही, असे देशवासीयांच्या जखमेवर मीठ चोळणारे विधान राहुल गांधींनी करायचे काही कारण नव्हते. पण शहाणपणा, समजूतदारपणा, प्रगल्भता आणि आपला दूरदूरपर्यंत संबंध नाही, हे राहुल गांधी आपल्या कृतीने आणि वाणीनेही दाखवून देत असतात; नव्हे वारंवार देशवासीयांसमोर सिद्ध करीत असतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी जो त्याग आणि बलिदान केले, हालअपेष्टा भोगल्या, त्याची बरोबरी नेहरू आणि गांधी घराण्यातील समस्त नेत्यांच्या त्याग आणि बलिदानाशी केली तरी सावरकरांचेच पारडे वर राहणार आहे. सावरकरांच्या नखाचीही बरोबरी नेहरू आणि गांधी घराण्यातील एकही नाही तर समस्त नेतेही करू शकत नाहीत. त्यामुळे ऊठसूट काँग्रेसचे नेते सावरकरांचा मुद्दा उपस्थित का करतात, हे कळत नाही.

 

मुळात आपण दुसर्‍याला कमी लेखून स्वत:चे मोठेपण सिद्ध करू शकत नाही. दुसर्‍याची रेष लहान करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपली रेष मोठी करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी करायला पाहिजे. बालिश चाळे करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी आता संयमाचे, समजदारपणाचे तसेच प्रगल्भतेचे राजकारण करणे अपेक्षित आहे. आपल्या वडिलोपार्जित संपत्तीच्या व्याजावर जगण्यापेक्षा राहुल गांधींनी राजकारणात आपल्या कमाईवर जगणे सुरू केले पाहिजे, तरच त्यांचा टिकाव लागू शकतो. बालक मंदिरातील मुलाचे बोबडे बोलणे मोठ्यांना कौतुकास्पद वाटते; मात्र महाविद्यालयात जाणारा तरुण जर बोबडे बोलण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याची चेष्टाच होणार, हे लक्षात घेतले पाहिजे. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अगदी सोनिया गांधींचा विचार केला तरी त्यांच्यात काही दोष निश्चितच होते. त्यांनी घेतलेल्या निर्णयांशी, त्यांच्या कार्यशैलीशी सगळेच सहमत असू शकणार नाहीत. पण असे असले तरी काही गुणही त्यांच्यात होते. त्यांचे स्वत:चे असे कर्तृत्व होते, हे कोणालाच नाकारता येणार नाही. या सर्व बाबतीत राहुल गांधी मात्र मोठे शून्य म्हणायला हरकत नाही. राहुल गांधींचे स्वत:चे असे काही कर्तृत्व नाही. खरं म्हणजे जी संधी राहुल गांधींना मिळाली, त्याजागी दुसरा कोणी नेता असता तर त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले असते, पण राहुल गांधींनी मात्र आतापर्यंत मिळालेल्या सर्व संधींची माती केली, असे म्हणावेसे वाटते. आपल्याला सर्व काही समजते, आपण अतिशय हुशार आहोत, आपल्याला कोणाची गरज नाही, आपण परप्रकाशी नाही तर स्वयंप्रकाशी आहोत, असा समज राहुल गांधींनी करून घेतला आहे. आपल्या या स्वभावाने राहुल गांधी स्वत:सोबत काँग्रेस पक्षाचेही नुकसान करीत आहेत. देशात जे काही काँग्रेसचे मूठभर नाही तर चिमूटभर समर्थक उरले, त्यांचाही अपेक्षाभंग करीत आहेत. भाजपा मोदींच्या रूपात जिंकणार्‍या घोड्यावर पैसे लावत असताना काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मात्र राहुल गांधी यांच्या रूपात हरणार्‍या घोड्यावर पैसे लावत आहेत; त्यामुळे त्याचे परिणामही भोगत आहेत.

 

9881717817