राहुल गांधींकडून लोकसभेत हिंदू समाजाचा अपमान! सुमोटो दाखल करा; प्रविण दरेकरांची मागणी

मुंबई : राहुल गांधींकडून हिंदू समाजाचा अपमान झाला असून त्यांच्याविरोधात निषेधाचा ठराव करून सुमोटो दाखल करून घ्यावा, अशी मागणी भाजप नेते प्रविण दरेकर यांनी सभागृह नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदू हिंसक आहे असे वक्तव्य केले. दरम्यान, त्याचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले.

विधानपरिषदेत बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, “राहुल गांधी म्हणाले हिंदू हिंसक आहे. त्यांच्या या वक्तव्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हटले. हा संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान असून जर पंतप्रधान हिंदू समाजाचा अपमान आणि हा विषय गांभीर्याने घेत असतील तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ही भूमी आहे. हे महाराष्ट्र राज्य आहे. या विधिमंडळाने राहुल गांधी यांच्या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे. त्यांच्या निषेधाचा ठराव करून सुमोटो आणावा,” अशी मागणी त्यांनी केली.

तसेच जोवर सुमोटो दाखल होत नाही तोवर आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. मात्र प्रचंड गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.