नवी दिल्ली । दिल्लीतील संसद मार्ग पोलिस ठाण्यात भाजपने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत भाजपने राहुल गांधींवर हत्या करण्याचा प्रयत्न आणि शारीरिक हल्ला करण्याचा आरोप केला आहे. संसदेच्या परिसरात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेनंतर ही तक्रार दाखल करण्यात आली.
भाजपने आरोप केला आहे की, राहुल गांधींनी शारीरिक हल्ला आणि धमकी दिली, तसेच त्यांनी एनडीएच्या खासदारांवर चालून जाऊन त्यांना धक्काबुक्की. यामुळे भाजपचे खासदार मुकेश राजपूत आणि प्रताप सारंगी जखमी झाले.
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी याबाबत दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली. विशेषतः बीएनएस कलम 109 अन्वये तक्रार देण्यात आली आहे.
भाजप खासदार अनुराग ठाकूर म्हणाले की, त्यांना कायद्याचे उल्लंघन करण्याची सवय आहे. त्यांच्या हाणामारीत दोन खासदार पडले आणि जखमी झाल्याची तक्रार खुनाच्या प्रयत्नाच्या कलमांतर्गत दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतरही राहुल गांधींचा अहंकार मोडला नाही आणि ते खासदारांना न भेटताच निघून गेले. राहुल गांधी स्वतःला कायद्यापेक्षा वरचे समजतात, असेही ते म्हणाले.
राहुल गांधींविरोधात तक्रार
कलम 109: हत्येचा प्रयत्न
कलम 115: स्वेच्छेने दुखापत करणे
कलम 117: स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे
कलम 121: सार्वजनिक सेवकाचे त्याच्या कर्तव्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी दुखापत करणे
कलम 351: गुन्हेगारी धमकी
कलम 125: इतरांची सुरक्षा समाप्त करणे
दुसरीकडे, यावर राहुल गांधींनी पलटवार करत भाजप खासदारांवर आरोप केला की, त्यांना संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर रोखले आणि धक्काबुक्की केली. आम्हाला संसदेत प्रवेशाचा अधिकार आहे, मात्र भाजप खासदारांनी हा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला.”