राहुल गांधींची राजकीय आत्महत्या !

अग्रलेख

 

राजकीय नेत्याला काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये, हे समजले पाहिजे. कारण अनेक वेळा राजकारणात चुकीचे वा अयोग्य बोलल्याची किंमत चुकवावी लागते. जिभेची धार ही शस्त्राच्या धारेपेक्षा जास्त तीव्र असते, याचा अनुभव आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी घेत आहेत.  त्यांची स्थिती आता गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले, अशी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल असभ्य तसेच अवमानजनक विधान केल्यामुळे सूरतच्या न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन वा त्यापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाली तर त्याला त्याचे सदस्यत्व गमवावे लागते.  त्यानुसार राहुल गांधींना आपल्या लोकसभा सदस्यत्वावर पाणी सोडावे लागले आहे. सूरतच्या न्यायालयाच्या निर्णयाला २४ तास लोटत नाही तोच लोकसभा सचिवालयाने केरळमधील वायनाडचे खासदार असलेल्या राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्याबाबतची अधिसूचना जारी केली.  यामुळे राहुल गांधी आता संसदेचे साधे खासदारही राहिले नाहीत.

 

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून राहुल गांधी सरकारच्या पाठीमागे हात धुवून लागले होते. लोकशाहीत आरोप-प्रत्यारोप चालत असतात; तो निकोप लोकशाहीचा भाग म्हणायला हरकत नाही. पण राहुल गांधींना मोदीफोबिया झाला आहे की काय, असे वाटायला लागले होते. भाजपाप्रणीत रालोआ सरकार आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हते. विरोधी पक्षाचे नेते म्हणून सरकारवर तसेच पंतप्रधान मोदींवर टीका करण्याचा राहुल गांधींना अधिकार आहे. हा अधिकार कोणीही नाकारला नाही.  मात्र, सरकारवर टीका करण्याच्या असलेल्या आपल्या अधिकाराचा त्यांनी सदुपयोग नाही तर दुरुपयोग केला, असे म्हणावेसे वाटते. कोणतीही टीका करताना ती तर्कसंगत तसेच वस्तुस्थितीवर आधारित असली पाहिजे. कोणतीही टीका ही बदनामी करणारी तसेच विखारी नसावी.  टीका करताना त्यातून सूडबुद्धी तसेच खुनशीपणा दिसणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. व्यापक समाजहितासाठी तुम्ही ती टीका करीत आहात, हे दिसायला पाहिजे. मात्र, राहुल गांधी बोलत नव्हते तर बरळत होते.

 

मोदींवर टीका करताना ते आता फक्त भाजपाचे नेतेच नाहीत तर देशाचे पंतप्रधानही आहेत, याचे भान राहुल गांधींना राहिले नाही.  त्यामुळे सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते, असे पातळी सोडणारे आणि आपली पातळी दाखवणारे विधान त्यांनी केले. राहुल गांधींबाबत जीभ घसरली वा ते अनावधानाने बोलले, असे म्हणायचीही सोय नाही. कारण अनावधानाने बोलले असते, तर त्यांनी लगेच माफी मागितली असती.  पण आपल्या बोलण्यावर ते ठाम राहिले, याचाच अर्थ राहुल गांधी जे बोलले ते ठरवून आणि जाणीवपूर्वक बोलले, असे समजायला हरकत नाही. राहुल गांधी वाट्टेल ते बोलत असताना, जहरी टीका करीत असताना पंतप्रधान मोदी मात्र शांत होते. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत राहुल गांधींवर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. बरं; हे पहिल्यांदाच झाले असेही नाही.  गेल्या आठ-साडेआठ वर्षांत राहुल गांधींनी मोदींबाबत नको ते शब्द वापरल्याचा काळा विक्रम केला आहे. आता राहुल गांधी महात्मा गांधी यांचे वाक्य वापरून त्यांनाही बदनाम करीत आहेत. माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य हाच माझा देव आहे आणि अहिंसा ते मिळविण्याचे साधन, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली असली, तरी त्याला आता अर्थ नाही. उसने अवसान असे त्याला म्हणावे लागेल.

 

राहुल गांधींना शिक्षा सुनावलेल्या सूरतच्या न्यायालयावरही काँग्रेस नेत्यांनी हेत्वारोप केले. राहुल गांधींना शिक्षा व्हावी म्हणून या न्यायालयातील न्यायाधीश बदलण्यात आले होते, असा आरोप काँग्रेसने केला. म्हणजे न्यायालयाने अप्रत्यक्षपणे सरकारच्या दबावाखाली शिक्षा दिली, असा अर्थ यातून निघतो.  असे करून आपण न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहोत, न्यायव्यवस्थेचा अवमान करीत आहोत, याचे भान काँग्रेसला राहिले नाही वा काँग्रेसने ते जाणीवपूर्वक ठेवले नाही, असे म्हणायला हरकत नाही. गांधी घराण्यात जन्मलो म्हणजे आपल्याला कोणाला काहीही बोलण्याचा अधिकार मिळाला, असा समज राहुल गांधींनी करून घेतला की काय ते समजत नाही.  संविधानाचा वापर करताना त्याच संविधानाच्या ठिकèया राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेते वारंवार उडवत असतात आणि दुसरीकडे लोकशाही धोक्यात आणल्याचा आरोप मोदी सरकारवर करीत असतात. राहुल गांधींना शिक्षा झाल्यामुळे तसेच त्यांचे सदस्यत्व गेल्यामुळे आता काँग्रेस आणि त्याचे समर्थन करणारे पक्ष काही दिवस थयथयाट केल्याशिवाय राहणार नाहीत.  हे सर्व मोदी सरकारवर राजकीय सूडबुद्धीचा आरोप करतील. पण देशातील जनता काँग्रेसच्या अशा अपप्रचाराला बळी पडणार नाही.

 

काय खरं आणि काय खोटे आहे, हे देशातील जनतेला चांगले माहिती आहे.  राहुल गांधींची लायकी देशातील जनतेने चांगल्या प्रकारे ओळखली आहे. त्यामुळेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातील जनतेने राहुल गांधींना त्यांची जागा दाखवली, पराभूत केले. आता वायनाडच्या जनतेलाही कोणत्या माणसाला आपण आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले, याचा पश्चात्ताप होत असेल. अमेठीच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना पराभूत करण्याचा जो निर्णय घेतला, तो किती अचूक होता, हे आता देशातील जनतेला समजले असेल.  राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी या अनेक प्रकरणांत जामिनावर आहेत. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशीही केली आहे.  त्यामुळे हे मायलेक तुरुंगात गेले तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण २००४ ते २०१४ या संपुआच्या १० वर्षांच्या कार्यकाळात या मायलेकरांनी कामेही तशीच केली आहेत. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना खुनाच्या प्रयत्नात शिक्षा झाल्यामुळे आपले सदस्यत्व गमवावे लागले. चारा घोटाळा प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झाल्यामुळे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद नेते लालूप्रसाद यादव यांचेही सदस्यत्व गेले होते.

 

न्यायालयाने दोन वा त्यापेक्षा जास्त कालावधींची शिक्षा सुनावल्यामुळे आतापर्यंत अर्धा डझन आमदारांना वा खासदारांना आपले पद गमवावे लागले आहे. तरीसुद्धा राहुल गांधी यांना शहाणपण येऊ नये, याचे आश्चर्य वाटते. पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे म्हटले जाते. अशा प्रकरणात अनेकांना शिक्षा झाल्यामुळे तरी राहुल गांधी सांभाळून वा जबाबदारीने बोलतील, असे वाटत होते. पण राहुल गांधी आणि शहाणपणा तसेच जबाबदारपणा यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, हे पुन्हा एकदा दिसून आले. मुद्दा म्हातारी मेल्याचा नाही तर काळ सोकावतो हा आहे.  राहुल गांधी आपल्या बेजबाबदारपणामुळे स्वत:चे तसेच आपल्या पक्षाचे म्हणजे काँग्रेसचे अपरिमित नुकसान करीत आहेत. राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा एक रुपयाचाही फायदा केला नाही; मात्र नुकसान हजार नाही तर काही लाख-कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. काँग्रेसचे जेवढे नुकसान आतापर्यंत कोणताही विरोधी पक्ष करू शकला नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान राहुल गांधींनी केले आहे. मुळात आपल्याला बोलता येत नसेल तर कशाला बोलावे. पत्रपरिषदेतही राहुल गांधी नको ते बोलून जातात आणि काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांना नंतर सारवासारव करावी लागते.  राहुल गांधींमुळे होणारे काँग्रेस पक्षाचे नुकसान पाहता काँग्रेस पक्षाने आता त्यांच्यापासून दूर झाले पाहिजे. राहुल गांधी आणि गांधी घराण्याशी असलेला आपला संबंध तोडला पाहिजे.

 

जोपर्यंत राहुल गांधी काँग्रेसचे नेते आहेत आणि राहतील, तोपर्यंत काँग्रेसचे असेच नुकसान होणार आहे.   कुठे पंतप्रधान मोदी आणि कुठे राहुल गांधी! या दोघांची कोणत्याच मुद्यावर तुलना आणि बरोबरी होऊ शकत नाही. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्यामभटाची तट्टाणी, तसे कुठे पंतप्रधान मोदी अन् कुठे राहुल गांधी, असे म्हणायला पाहिजे. पण काँग्रेस पक्षाला कधी शहाणपणा येणार नाही. मुळात आताच्या काँग्रेस पक्षात शहाणपणा असलेले नेतेच उरले नाहीत. जे होते, त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे.  कारण काँग्रेसलाच जिथे देशात भवितव्य उरले नाही, तेथे काँग्रेस पक्षात आपल्याला भवितव्य उरले नाही, याची काँग्रेस सोडलेल्या नेत्यांची खात्री पटली होती. शिवसेनेत उद्धव ठाकरेंना कंटाळून नेते शिवसेना सोडत होते, तशीच स्थिती आता काँग्रेसची झाली आहे. काँग्रेसमध्येही आता राहुल गांधींना वैतागून नेते पक्ष सोडत आहेत. तरीसुद्धा पक्षश्रेष्ठींना अक्कल येत नाही, याचे आश्चर्य वाटते.  राहुल गांधींचे आता करावे तरी काय, असा प्रश्न देशातील जनतेला आणि काँग्रेस पक्षालाही पडला आहे.