तरुण भारत लाईव्ह ।१५ जानेवारी २०२३। भुसावळ : घरात झालेल्या शॉर्ट सर्किटनंतर आग लागल्याची घटना शहरातील लिंम्पस क्लब भागातील रेल्वे वसाहतीमधील निवासस्थानात शनिवार, 14 रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडली. सुदैवाने वेळीच सिलिंडर बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र या आगीत मोठ्या प्रमाणावर संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले.
फ्रीजने पेट घेताच भडकली आग
लिंम्पस क्लब संत गाडगेबाबा हायस्कूल परिसरातील रेल्वे वसाहतीत क्वॉर्टर नंबर आरबी – चार – 1064- बी मध्ये रेल्वेच्या पीओएचमधील कर्मचारी एस. एन. पवार वास्तव्यास आहेत. शनिवारी सकाळी फ्रिजला जोडणी केलेल्या केबलमध्ये शॉर्टसर्किट होताच फ्रिजने पेटला व त्यानंतर आग वाढतच गेली. रहिवाशांनी वाळूसह मातीद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग वाढल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीमुळे स्वयंपाक घरातील भांडे, किचनमधील साहित्यासह अन्य संसारोपयोगी साहित्य खाक झाले. भुसावळ अग्निशमन विभागाचे फायरमन कर्मचारी प्रवीण मिठे, संजय जावळे व चालक संजय भिमसेने आदींनी आगीवर नियंत्रण मिळवले.