जळगाव : जळगाव जंक्शन स्थानकावर लोहमार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला वेगाने जात असलेल्या इंजिनाची धडक बसल्याची घटना मंगळवार, २७ रोजी घडली. यात ती महिला जबर जखमी झाली. विशेष म्हणजे फलाटावर कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबल या महिलेसाठी देवदूत ठरला. कॉन्स्टेबल यांनी प्रसंगावधान राखत या महिलेचा जीव वाचवला. या जखमी महिलेला तातडीने स्ट्रेचरवरून रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
जळगाव जंक्शन स्थानकावर मंगळवार सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास एक महिला दोन नंबरच्या फलाटावरून तीन नंबरच्या फलाटावर येण्याचा प्रयत्नात होती. त्याच वेळी मुंबईकडून भुसावळकडे भरधाव वेगाने डिझेल इंधनाची वॅगन येत असल्याचे पाहून कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे कॉन्स्टेबल चांगो देवराम चौधरी यांनी महिलेला सावध केले. परंतु फलाट ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या महिलेचे येणाऱ्या वॅगनकडे लक्ष नसल्याने क्षणात जोरदार धडक बसली. यात हवेच्या वेगाने ती महिला पाच ते सात फूट इंजिनाच्या दिशेने ओढली गेली. त्याच वेळी रेल्वे कॉन्स्टेबल चौधरी यांनी प्रसंगावधान राखून फलाटावर आडवे पडून या महिलेला ओढून जीवदान दिले. तेथे उपस्थित असलेल्या रेल्वे पोलीस सुरक्षा पथकासह रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने स्ट्रेचरवरून शासकिय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
स्वत:च्या सुरक्षीततेसाठी रेल्वे नियमांचे पालन करा
जंक्शन स्थानकांवर या फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी पादचारी पूल आहेत. प्रवासी नागरिकांनी लोहमार्ग ओलांडू नये, ते धोकादायक असून ते टाळण्यासाठी बऱ्याच ठिकाणी बॅरिकेटस लावण्यात आलेल्या आहेत. प्रसंगी पथकाकडून दंडात्मक कारवाई देखील केली जाते. रेल्वे फलाटावर आरपीएफ जवान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असून ते वेळोवेळी रेल्वे सुटण्याच्या तसेच येण्याच्या दरम्यान प्रवाशांना बोगी पासून योग्य अंतरावर राहण्याच्या सूचना करतात. तसेच प्रसंगी सुरक्षीतपणे चढ उतार करण्यास मदत, मार्गदर्शन करीत सावध करतात. असे असले तरी बरेच प्रवासी याकडे दुर्लक्ष करतात. प्रवाशांनी स्वत:च्या सुरक्षीततेसाठी आरपीएफ जवानांनी केलेल्या सूचनेकडे व रेल्वे प्रशासनाच्या नियमांचे काळजीपूर्वक पालन करावे.
= ज्ञानेश्वर पाटील, पोलीस निरीक्षक, आरपीएफ जळगाव.