रेल्वे सुरक्षा बलाने ५१ लाखांचे साहित्य प्रवाशांना केले परत

जळगाव : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) ने मे – 2023 मध्ये ‘ऑपरेशन अमानत’ राबवून चोर- भामट्यांकडून जप्त केलेला 51.13 लाखांचा ऐवज रेल्वे प्रवाशांना परत केला. चोरी गेलेला, हिसकावून नेलेला मौल्यवान दागिना अथवा चिजवस्तू अनपेक्षितपणे परत मिळाल्याने 119 प्रवासी आनंदले आहेत. प्रवासाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे जरा का लक्ष विचलित झाले तर चोर, भामटे हात दाखवितात. कधी कुुणाचे दागिने आणि रोख तसेच मौल्यवान चिजवस्तू असलेली पर्स लांबविली जाते. कुणाचे मंगळसूत्र तर कुणाचा मोबाईल लंपास केला जातो. यामुळे अस्वस्थ झालेले प्रवासी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल करतात. नंतर पोलीस त्याचा शोध घेतानाच संबंधित चोरीच्या गुन्ह्याची तक्रार वजा माहिती आरपीएफलाही कळविते. मध्य रेल्वेतील रेल्वे सुरक्षा बलाने मे 2023 मध्ये 51 लाख 13 हजार रुपयांचा माल रेल्वे प्रवाशांना परत सोपवला. यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

मध्य रेल्वेच्या नागपूर, भुसावळ, मुंबई, पुणे व सोलापूर या पाच विभागात ही प्रक्रिया पार पडली.

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) कर्मचारी नेहमीच आघाडीवर असतात आणि केवळ रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षेमध्ये 24 तास जागरुकता ठेवत नाहीत तर जीवन वाचवणारे, पळून गेलेल्या मुलांना वाचवणारे, सामान वाहक आदी अनेक भूमिका बजावतात.