मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असला तरी अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्याचं चित्र आहे. अशात हवामान खात्याकडून पुढच्या ३-४ तासांसाठी महाराष्ट्रातल्या ९ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील ३-४ तासांत जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असंही हवामान खात्याकडून सूचित करण्यात आलं आहे.
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सिंधुदूर्ग, नाशिक, औरंगाबाद, जालना, धुळे, जळगाव, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना आज १३ जुलै रोजी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात ला आहे. शनिवार, १५ जुलैपर्यंत आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची तसेच सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. १६ व १७ जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील तसेच २२ जुलैपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे.