Rain Alert : हवामान खात्याकडून राज्यातील आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, आज जळगावात कशी आहे पावसाची स्थिती?

जळगाव । यंदा मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतरही अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस पडला नव्हता. मात्र मागील आठवड्याभरापासून राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यातील आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस हजेरी लावणार आहे. यासोबतच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर आणखीच वाढणार असून नागरिकांना कामानिमित्तच घराबाहेर पडा, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहे. जिल्ह्यातील शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या महिन्यातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत यंदा केवळ २६ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. जून महिन्यात १२६ मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ३६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.