बंगालच्या उपसागरात प्रत्‍यवर्ती चक्रीवादळ : महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, जळगाववर परिणाम होणार का?

जळगाव ।  राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमान ३४ ते ३८ अंशांच्या दरम्यान पोहोचले आहे. जळगाव जिल्ह्यातही उन्हाचा प्रभाव वाढला असून, थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. बुधवारी येथे कमाल तापमान ३५ अंश तर किमान तापमान १५ अंश नोंदवले गेले. वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या सुमारास रस्त्यांवर कमी गर्दी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात प्रत्‍यवर्ती चक्रीवादळ तयार होत असून, त्याचा प्रभाव राज्यातील काही भागांवर दिसून येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २१ आणि २२ फेब्रुवारीला मराठवाडा व विदर्भातील काही भागांत ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा

राज्यातील मुंबई, सांताक्रूझ, नाशिक, पुणे, संभाजीनगर, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी आणि यवतमाळ या शहरांमध्ये तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उष्णतेची तीव्रता जाणवत आहे. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, आगामी तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांत कोरडे हवामान राहील, तसेच उन्हाचा चटका अधिक जाणवेल.

चक्रीवादळाचा जळगाव जिल्ह्यावर परिणाम नाही

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा जळगाव जिल्ह्यावर कोणताही परिणाम होणार नाही, मात्र विदर्भातील काही भागांवर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. विदर्भातील काही ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम शेतीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. गरजे शिवाय उन्हात बाहेर पडू नये, तसेच पुरेसा पाणी व द्रव पदार्थांचा सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा कायम राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याची गरज आहे.