Rain Update : मागील आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने पुनरागमन केलं आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. अशातच येत्या चार ते पाच दिवसात राज्यात पावसाचा जोर आणखीच वाढणारअसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
नव्या आठवड्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर समाधानकारक असेल, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्याच्या पूर्व भागात पावसाचं प्रमाण अधिक असेल, तर मुंबईसह कोकणात देखील धुव्वाधार पाऊस होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, आज म्हणजेच सोमवारी देखील राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोकणात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. याशिवाय धरणांमधील पाणीसाठा देखील वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.