---Advertisement---

जळगावकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; घराबाहेर जाणे टाळा, पालकमंत्र्यांचे आवाहन

---Advertisement---

जळगाव : खान्देशात सोमवारी (५ मे) व मंगळवारी (६ मे) वादळी वाऱ्यांसह बेमोसमी पावसाने शेतपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. काही भागांत गारपीटही झाली. जळगाव जिल्ह्यात वीज कोसळून एकजण जखमी, तर सहा पशुधनांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. जिल्ह्यात बेमोसमी पावसामुळे १०२ हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. अशात आज बुधवारी पुन्हा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबईकडून जिल्ह्यासाठी “रेड अलर्ट” जारी करण्यात आला असून, काही भागांत ताशी ५०–६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, खान्देशातील जळगावसह धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांत सोमवारी (५ मे) व मंगळवारी (६ मे) सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चाळीसगाव आणि जामनेर तालुक्यात सुमारे १०२ हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांसह फळबागांचे नुकसान झाले. पारोळा तालुक्यात तुक्यात वीज कोसळून एकजण जखमी झाला, तसेच एक गाय व जामनेर तालुक्यात तीन म्हशींचा, तर एरंडोल तालुक्यात एका म्हशीचा मृत्यू झाला. एरंडोल तालुक्यातील एकलग्न बुद्रूक येथील ढोलू विश्वनाथ पाटील यांची म्हैस गावात झाडाखाली बांधली असता वीज कोसळून जागीच ठार झाली.

गणेशनगर (ता. एरंडोल) येथे विष्णू धना जोगी यांच्या झोपडीवर झाड उन्मळून पडत्याने झोपडीचे व संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. नशिराबाद येथे गारपीट सुरू असून, काही पिकांचे नुकसान व घरावरील पत्रे उडाल्याबाबत प्राथमिक माहिती आहे. तसेच निमगाव बुद्रूक येथे काही पिकांचे नुकसान झाले. वाकडी येथे गारपीट झाली असून, घराच्या छतावरील पत्रे उडाली असून पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. आहे.

धारागीर सुरेश गोपीचंद पाटील यांची म्हैस वीज कोसळत्याने मृत्युमुखी पडली. पुनगाव येथे युवराज एकनाथ बाविस्कर यांची म्हैस झाड उन्मळून पडल्याने मृत्यू झाला. धानोरा मंडळातील धानोरा व देवगाव वादळी वाऱ्यांमुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले. लोणी व पंचक या गावांमध्ये पपई पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकारी प्रसाद यांनी पाहणी केली. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने थैमान घातले. साक्री तालुक्यातील अनेक गावांमध्ये वेगवान वाऱ्यांसह बेमोसमी मुसळधार पाऊस व गारपीट झाली आहे. पपई, केळी, आंब्यांचे मोठे नुकसान झाले.

जळगावला वादळ, पावसाचा ‘रेड अलर्ट’

जळगाव : मुंबई येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने जळगाव जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’
जारी केला असून, काही भागांत ताशी ५०-६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बचाव यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून, नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे व व प्रशासनाने जाहीर केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘प्रशासन सज्ज आहे. मात्र, नागरिकांनीही जबाबदारीने वागून काळजी घ्यावी,” असे आवाहन करीत कोणताही विलंब न करता नुकसानग्रस्त भागांतील पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment