तरुण भारत लाईव्ह । १२ एप्रिल २०२३। यंदा मान्सूनच्या मोसमात सरासरी इतका म्हणजे ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने जाहीर केला. सोमवारी स्कायमेटने अपुऱ्या मान्सूनची भविष्यवाणी वर्तवून शेतकऱ्यांच्या चिंता वाढविल्या होत्या. मात्र भारतीय हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 96% म्हणजे सरासरी इतका पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. मध्य महाराष्ट्रातील काही भागात सरासरी इतका तसेच चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्याच्या अन्य भागांमध्ये पान्सून कमजोर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पन्नास वर्षांच्या दीर्घावधीच्या सरासरीनुसार मान्सूनच्या चार महिन्यांच्या मोसमात १००४ मिमी पर्जन्यवृष्टीची नोंद केली जाते. अंदमान निकोबार द्वीपसमूहात 20 मे च्या आसपास मान्सूनचे आगमन झाल्यानंतर हवामान खात्याकडून मेअखेर सुधारित अंदाज व्यक्त करण्यात येईल.