नंदुरबारमध्ये रजनी नाईक यांनी घेतला उमेदवारी अर्ज

नंदुरबार : काँग्रेसने नंदुरबार लोकसभेसाठी ॲड. गोवाल पाडवी यांची उमेदवारी दिली आहे. परंतु; काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक व त्यांच्या पत्नी रजनी नाईक यांनी देखील शेवटच्या क्षणी प्रत्येकी चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यांच्या या कृतीमुळे काँग्रेसतर्फे उमेदवार बदलेल का ? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.

नंदुरबारमधून लोकसभेसाठी माजी आदिवासी विकास मंत्री के. सी. पदवी आणि आमदार शिरीष नाईक यांच्या पत्नी रजनी नाईक यांची नावे आघाडीवर होती. पदाधिकाऱ्यांकडून या दोघांपैकी एकाला उमेदवारी दिली जाईंल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, अनपेक्षितपणे काँग्रेसने ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली. अशातच काँग्रेससाठीच आमदार शिरीष नाईक आणि त्यांच्या पत्नी रजनी नाईक यांनी देखील प्रत्येकी चार अर्ज घेतले आहेत. त्यामुळे काँग्रेस उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम क्षणी नवा धक्का देणार की काय, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. अशातच काँग्रेस कार्यकर्ते रजनी नाईक यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी करत आहेत. तर के. सी. पाडवी यांनीही उमेदवारीच्या माघारीपर्यत कोणाच्या उमेदवारीचे काहीच खरे नसते, असे म्हटले होते.