मोठी बातमी : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार रजनीश सेठ यांनी स्वीकारला. रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. कोकण भवन, नवी मुंबई येथे रजनीश सेठ यांनी गोपनीयतेची शपथ घेतली.
यावेळी आयोगाचे सदस्य डॉ.दिलीप पांढरपट्टे, डॉ.अभय वाघ, डॉ.सतिश देशपांडे, आयोगाच्या सचिव डॉ.सुवर्णा खरात, सहसचिव सुभाष उमराणीकर, सहसचिव सुनिल अवताडे, उपसचिव मारुती जाधव, देवेंद्र तावडे, चंद्रशेखर पवार, संजय देशमुख, विपुल पवार, संशोधन अधिकारी भिसे आदी उपस्थित होते.
आयोगाच्या सचिव डॉ.सुवर्णा खरात यांनी रजनीश सेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रचना व कार्य पद्धतीविषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. ही माहिती समजून घेतल्यानंतर सेठ यांनी आयोगाचा कारभार हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत अतिशय शिस्तबद्धतेने, पारदर्शकपणे करु, असे आवाहन आयोगाच्या सन्माननीय सदस्यांना व इतर अधिकाऱ्यांना केले.
रजनीश सेठ यांची कारकीर्द
रजनीश सेठ हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९६३ रोजी झाला. रजनीश सेठ हे २५ ऑगस्ट १९८८ ला पोलीस दलात भरती झाले. रजनीश सेठ यांनी शिक्षण हे बी ए ऑनर्स (एल एल बी) पर्यंत शिक्षण झालं आहे. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख देखील राहिलेले आहेत.
त्याचबरोबर त्यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव, राज्याच्या कायदा आणि सुव्यस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. सेठ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपद म्हणूनही काम केलं. सेठ त्यांच्याकडे २०२१ मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. तर सेठ यांची 2022 मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालपदी नियुक्ती करण्यात आली होती.