मुक्ताईनगर ः रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या तापी नदीवरील ‘मेगा रिचार्ज’ अर्थात तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजनेबाबत (मेगा रिचार्ज) केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांनी निवासस्थानी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. राज्यातील जळगाव, बुलढाणा, अकोला अमरावती या जिल्ह्यांतील दोन लाख 13 हजार 706 हेक्टर क्षेत्र तसेच मध्य प्रदेशातील खंडवा, बऱ्हाणपूर या जिल्ह्यांतील 96 हजार 82 हेक्टर क्षेत्रात पाणी पुनर्भरण होऊन भूजल पातळी वाढीमुळे अप्रत्यक्ष सिंचनाचा फायदा होईल.
पतापीचे गुजरातला वाहून जाणारे पाणी मेळघाटातील खारीया घोटीजवळ अडवून उजव्या आणि डाव्या कालव्यांच्या माध्यमातून त्याचे जमिनीत पुनर्भरण केले जाईल. सातपुड्याच्या रांगेतून मध्य प्रदेशातील अशीरगडपासून तापी नदीचे पाणी कालव्यांद्वारे वळवून रावेर, यावल, चोपडा तालुक्यांतील नदी-नाल्यात उतरवून मेगा रिचार्ज होऊ शकेल. यासाठी मध्य प्रदेशातील खारीया घोटी येथे तापीवर धरण बांधून त्यातील पुराचे वाहणारे पाणी पावसाळ्यात बऱ्हाणपूर, यावल, चोपडा व रावेर तालुक्यांत कालव्याच्या माध्यमातून नदी-नाल्यात जिरवले जाईल.
19 हजार 244 कोटींचा अहवाल तयार
प तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजनेचा 19 हजार 244 कोटींचा अहवाल तयार आहे. राज्य तांत्रिक सल्लागार समिती, नाशिक यांच्या सहमतीसाठी शासनाकडे तो सादर करण्यात आला आहे. राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या पुढाकाराने केंद्र शासन स्तरावर जलशक्ती मंत्रालय केंद्र सरकार, दिल्ली येथे लवकरच बैठक होईल. योजनेच्या मंजुरीसाठी महाकाय पुनर्भरण योजनेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र शासन, मध्य प्रदेश शासन, केंद्र सरकारमधील संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्यासाठी बोलावण्यात येणार आहे. दरम्यान, मुक्ताईनगरातील बैठकीला तापी विकास महामंडळातर्फे कार्यकारी अभियंता दाभाडे व उपविभागीय अभियंता के.पी.पाटील उपस्थित होते.