जळगाव : केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया (PEFI) आणि क्राफ्टन व इन्व्हेस्ट इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित Esports Conclave 2025 मध्ये सहभाग घेतला. भारताला जागतिक ईस्पोर्ट्स क्षेत्रात अग्रस्थानी नेण्यासाठी धोरणात्मक चर्चा आणि संधींवर भर देण्यात आला.
राज्यमंत्री खडसे यांनी ईस्पोर्ट्सच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता वाढवणे, रोजगार निर्मिती आणि त्याला मुख्य प्रवाहातील क्रीडा प्रकार बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, ईस्पोर्ट्स क्षेत्रातील प्रतिभा आणि नवोपक्रम वाढवण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने ईस्पोर्ट्समधील पदक विजेत्यांना रोख प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 मध्ये भारतात सुमारे 6 लाख ईस्पोर्ट्स खेळाडू होते, ही संख्या झपाट्याने वाढत असून पुढील पाच वर्षांत 10 लाखांहून अधिक खेळाडू होण्याची शक्यता आहे.
या परिषदेत क्राफ्टन इंडिया चे CEO सीन ह्युनिल सोन आणि अन्य उद्योगतज्ज्ञांनी ईस्पोर्ट्सच्या वाढीचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम याविषयी चर्चा केली. तसेच इन्व्हेस्ट इंडिया चे वरिष्ठ उपाध्यक्ष अमूल्य साह, उत्तर प्रदेश ऑलिम्पिक असोसिएशन चे महासचिव आनंदेश्वर पांडे, PEFI चे राष्ट्रीय सचिव पीयूष जैन यांच्यासह अनेक अधिकारी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.