Ram Mandir : मंदिर उभारणीत जळगाव ,चाळीसगाव सह पुण्याच्या अभियंत्यांचे योगदान…कोण आहेत ते वाचाच

Ram Mandir : श्रीराम मंदिर प्रकल्प उभारणीत आठपैकी पाच मुख्य अभियंते हे महाराष्ट्रातील आहेत. श्रीराम मंदिर उभारणीसाठी अयोध्येत सध्या ६५ अभियंते, त्यावर देखरेख करणारे १२ प्रकल्प व्यवस्थापक आणि चार हजार ५०० कामगार प्रत्यक्ष रामजन्मभूमी स्थळावर कार्यरत आहेत. याशिवाय दगड घडविणारे, लाकडावर कोरीव काम करणारे १०-१२ हजार कामगार विविध ठिकाणी आहेत.

हे आहेत महाराष्ट्राचे अभियंते

श्रीराम जन्मभूमी न्यासाकडून आठ मुख्य अभियंते प्रकल्प व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यात डॉ. जगदीश आफळे (पुणे), गिरीश सहस्त्रभोजनी (गोवा), जगन्नाथ गुळवे (संभाजीनगर), सुभाष चौधरी (जळगाव), अविनाश संगमनेरकर (नागपूर) यांचा समावेश आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि मदुराईमधील तीन अभियंत्यांचा समावेश आहे. तसेच टाटा कन्सल्टन्सीतर्फे राधेय जोशी (पुणे), ‘एल अँड टी’तर्फे सतीश चव्हाण (चाळीसगाव), साइट सिक्युरिटी मॅनेजर संतोष बोरे (बोरिवली) हेदेखील मंदिर उभारणीत आहेत.

पुण्यातील पद्मावती भागातील रहिवासी असलेले डॉ. आफळे यांना देश-परदेशातील मोठे बांधकाम प्रकल्प उभारणीचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांची पत्नी माधुरी यादेखील मंदिर शिल्पकलातज्ज्ञ आहेत. हे दोघेही गेल्या साडेतीन वर्षांपासून अयोध्येत मंदिर उभारणीच्या कार्यात पूर्ण वेळ सहभागी आहेत. तत्पूर्वी सुमारे तीन वर्षे या दांपत्याने अमेरिकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विस्तारक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. तर मूळचे नागपूरचे असलेले सहस्त्रभोजनी यांनीही देशात-परदेशात मोठ्या प्रकल्पांवर अनेक वर्षे काम केले आहे. ते ३० वर्षांपासून गोव्यात स्थायिक झाले असले तरी गेल्या तीन वर्षांपासून अयोध्येतच आहेत.

येथील दिनचर्येबाबत डॉ. आफळे म्हणाले, ‘‘अभियंता म्हणून आमच्याकडे विशिष्ट जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. आम्ही पूर्ण वेळ आम्हाला दिलेले काम करतो. दर शनिवारी आमची येथे आढावा बैठक असते. श्रीराम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधी अवनीश अवस्थी यांच्यासह काही अधिकाऱ्यांबरोबर दर सोमवारी बैठक होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महिन्यातून एकदा येथे प्रत्यक्ष येऊन आढावा घेतात. नियोजित वेळापत्रकानुसार शिस्तबद्ध पद्धतीने काम चालेल यावर आमचा कटाक्ष असतो.’’ मंदिर उभारणीच्या प्रशासकीय कामात माधुरी यादेखील सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.

सहस्त्रभोजनी म्हणाले, ‘‘राम मंदिर प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष मंदिर उभारणी आणि परिसराचे विकसन हे दोन स्वतंत्र टप्पे आहेत. आराखड्यानुसार अचूकपणे कामे व्हायला हवीत, ही आमची जबाबदारी आहे. त्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे अन्य गोष्टींसाठी फारसा वेळ मिळत नाही. २२ जानेवारीला पहिल्या टप्प्याचे उद्‍घाटन झाले तरी पुढे किमान दोन ते तीन वर्षे अजून इतर कामे होत राहतील. त्याचेही नियोजन केले आहे.’’

श्रीराम मंदिराच्या उभारणीमध्ये सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळाली, हे आमचे भाग्य असून, राष्ट्रकार्य समजूनच आम्ही ते करीत आहोत, अशी भावना डॉ. आफळे आणि सहस्त्रभोजनी यांनी  व्यक्त केली.