आयएसआयकडून घेतले होते प्रशिक्षण
लखनौ : कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचे केंद्र असलेल्या अयोध्येतील राममंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याचा नापाक मनसुबा गुजरात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि फरिदाबाद विशेष कृती दलाने (एसटीएफ) उधळला आहे. दोन राज्यांतील पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत अब्दुल रहमान नावाच्या तरुणाला अटक केली. तो अयोध्यतील रहिवासी आहे. त्याच्या ताब्यातून दोन ग्रेनेड जप्त करण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने ते निष्क्रिय केले आहेत. अब्दुल रहमान पाकिस्तानातील पाताळयंत्री गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. राममंदिरावर हल्ला घडवण्यासाठी आयएसआयने त्याला तयार केले होते. तो कित्येक कट्टरपंथी जमातींसोबत जुळला असल्याची माहितीही समोर आली. राममंदिराची उभारणी झाल्यानंतर त्यावर हल्ला करण्याचा कट आयएसआयने रचला होता.
अब्दुलने यापूवीर्ती राममंदिराची पाहणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. राममंदिरातील सुरक्षेची माहिती त्याने आयएसआयला दिली होती. मंदिरात ग्रेनेड हल्ला करून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता. त्यातच एक अतिरेकी भारतात मोठा हल्ला घडवण्याचा कट रचत असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने सापळा रचला आणि अब्दुल रहमानला अटक केली. अब्दुल रहमान आयएसआयच्या इस्लामिक स्टेट खुरासान प्रोव्हिन्स अर्थात् आयएसकेपीचा सदस्य आहे. या मोड्युलच्या उर्वरित सदस्यांचा शोध आता सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला आहे. कडक सुरक्षा आणि सतर्कतेचा आदेश अब्दुलला अटक झाल्यानंतर अयोध्येसह देशभरातील सर्वदेनशील धार्मिक स्थळांची सुरक्षा कडक करण्याचा तसेच सतर्कतेचा आदेश देण्यात आला. दहशतवाद्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही आणि त्यांचे संपूर्ण नेटवर्क खोदून काढले जाईल, असे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले.
अब्दुलची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी
सध्या हरयाणा पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा अब्दुल रहमानची कसून चौकशी करीत आहेत. त्याच्या मोबाईलचे न्यायवैद्यक परीक्षण केले जात आहे. यात कोण-कोण सहभागी आहेत, याची माहिती अब्दुलकडून घेतली जात आहे.
अशा आवळल्या मुसक्या
फैजाबाद येथून रेल्वेगाडीने अब्दुल रहमान फरिदाबाद येथे गेला होता. तिथे त्याच्या सूत्रधाराने त्याला दोन ग्रेनेड सोपवले. रेल्वेने अयोध्येला पोहोचल्यावर हल्ला करण्याची योजना त्याने आखली होती. मात्र, त्याची माहिती आधीच सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने संयुक्त कारवाई करीत अब्दुल रहमानच्या मुसक्या आवळल्या.