जळगाव : मार्चच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले असून, बाष्पीभवनातून जलसाठ्यांची पाणी पातळी घटू लागली आहे. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्पातून आवर्तने सोडली जात आहेत. वाघूर जलसाठ्यात आतापावेतो चांगली स्थिती आहे. मात्र संभाव्य प्रचंड उन्हाच्या तडाख्यात पाणी साठ्यात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यानुसार पिण्याच्या पाण्याची नासाडी रोखणे ही आजची गरज आहे.
शहरात नळांना पाणी आल्यानंतर टाक्या भरत्या जातात. त्यातून पाणी ओसंडून व्यर्थ जाण्याचे चित्र बऱ्याच वेळा दिसते. याची नागरिकांनी काळजी घेत नासाडी टाळण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. एप्रिल-मेच्या भयाण तापमानात जलसाठ्यातील पाणी वाचविणे, हे जिल्ह्यासाठी आव्हान ठरणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
हेही वाचा : १ एप्रिलपासून देशात लागू होणार नवे नियम, घरातील प्रत्येकाच्या खिशावर होणार परिणाम!
जळगाव जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीला सुमारे ३५, ४० आणि ५० टक्के जलसाठा आहे. तर वाघूर धरणात ७५ टक्के जलसाठा आहे. ही समाधानकारक बाब असली तरी पाण्याची नासाडी होऊ नये, याची काळजी घेणे जरूरी आहे. भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य टाळायचे असेल तर पाणी नासाडीच्या मुद्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
समाधानकारक पाऊस तरीही..?
या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प पाण्याने भरलेले होते. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात टंचाई जाणवणार नाही, असे अनुमान नोव्हेंबर महिन्यात लावले जात होते. त्यानंतर मात्र अवघ्या दोन महिन्यात जलसाठ्यांची पातळी वेगाने घटली. परिणामी मार्च महिन्यात तिसऱ्या-चौथ्या सप्ताहात जिल्ह्यात अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. त्या अनुषंगाने जवळपास १०० टँकरद्वारा पिण्याच्या पाण्याची पूर्तता केली जात आहे. आणखी पाण्याच्या टँकरची गरज भासू लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
टाकीतून ओसंडते पाणी
ज्या परिसरात नळांना पाणी येते, त्या दिवशी पाण्याची सर्वाधिक नासाडी होत असल्याचे दिसून येत आहे. या वाया जाणाऱ्या पाण्याची बचत करण्याची गरज आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असते. त्याबरोबरच उन्हाळ्यात पाण्याचा कुलर व पिण्यासाठीही पाण्याचा अधिक वापर होतो. या गरजा लक्षात घेता, निरर्थक जाणाऱ्या पाण्याची बचत करणे हा पर्याय चांगला ठरेल.
गटारीत पाणी वाया जाऊ देऊ नये, वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची डिमांड जास्त असते. पिण्याचे पाणी सर्वांना उपलब्ध व्हावे, यासाठी सर्वांनी पाण्याचा जपून वापर करत बचत करण्याची सवय लावणे गरजेचे आहे.
– श्यामकांत भांडारकर, शाखा अभियंता, मनपा पाणीपुरवठा विभाग, जळगाव