राज्यात मुस्लिम, ख्रिश्चन लोकसंख्येत झपाट्याने वाढ; युसीसी चा अहवाल!

नवी दिल्ली : देशात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात हालचाली सुरू आहेत. आता उत्तराखंड सरकार राज्यात समान नागरी कायदा आणण्याच्या तयारीत असून सरकारकडून मसुदा सादर करण्यात आला आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या युसीसी पॅनलचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे.

सरकारने सार्वजनिक केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, राज्यात लोक डोंगरातून मैदानी प्रदेशात स्थलांतर करत असून तर मैदानी भागात शहरी लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. ही लोकसंख्या केवळ उत्तराखंडमधीलच नाही तर इतर राज्यांतून आलेल्या लोकांमुळेही आहे. विशेष म्हणजे उत्तराखंडमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चनांची लोकसंख्या हिंदू आणि शीखांच्या तुलनेत २ पटीने वाढली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

युसीसी पॅनलच्या अहवालानुसार, उत्तराखंडमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच, डोंगराळ भागातून नागरिकांचे स्थलांतर होत असून स्थलांतरामुळे लोकसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे, असे या अहवालातून समोर आले आहे. एकंदरीत, उत्तराखंड समान नागरी संहिता(युसीसी) पॅनेलच्या अहवालाने बदलत्या लोकसंख्येकडे लक्ष वेधले आहे.

दरम्यान, राज्याच्या डोंगराळ भागात लोकसंख्या कमी होत असून मैदानी भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा इतर राज्यांतून आलेल्या स्थलांतरितांचा आहे. अहवालात नमूद केले आहे की, उत्तराखंड २०२१-२२ च्या सांख्यिकी डायरीनुसार, २००१-११ या कालावधीत मैदानी भागातील शहरी भागात ३०.२३% लोकसंख्या वाढ दिसून आली आहे. दुसरीकडे, अल्मोडा आणि गढवाल या दोन पहाडी जिल्ह्यांमध्ये या काळात लोकसंख्येत पूर्ण घट झाली आहे.