लखनऊ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या विधानाला समर्थन दिले आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबालेंनी संबोधित करत असताना सांगितले की, हिंदू एकता हे संघाचे जीवन वर्तुळ आहे. हे आम्ही ठामपणे सांगू आणि भविष्यातही यासाठी प्रयत्न करू. यावरून संघाला आपल्या हिंदुत्ववादी विचारसरणीस धार लावण्याचे काम उत्तर प्रदेशाच्या भूमीत होणे योग्य वाटते हे स्पष्ट होते.
अयोध्येनंतर मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि वाराणसी येथील काशी विश्वनाथ-ज्ञानव्यापी मशिदीचे हे मुद्दे संघाच्या हिंदुत्ववादी विचारसरणीशी सलग्न आहेत. मथुरेत झालेल्या एका राष्ट्रीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत या मुद्यांवर सखोल चर्चा होत आहे. या बैठकीत धर्मांतरण, लव्ह जिहाद इतर काही मुद्द्यांवर संघ पुढील कार्यक्रम ठरवणार आहेत. बैठकीनंतर संघ स्वयंसेवकांना कार्याचा विस्तार करण्यासाठी नवीन लक्ष्य देण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला.
यावेळी बोलत असताना संघाने योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या विधानावर संघाने स्पष्टपणे म्हटले की, आपण आपले स्वत:चे कल्याण केले पाहिजे. ज्यात हिंदू एकता अत्यंत आवश्यक आहे. काही शक्ती हिंदूंना तोडण्याचे काम करत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
तसेच ते पुढे बोलत असताना त्यांनी लव्ह जिहादवरही भाष्य केले. ते म्हणाले की, आगामी काळात धर्मांतरण आणि लव्ह जिहाद हे संघाचे महत्त्वाचे मुद्दे असतील, धर्मांतरण रोखण्यासाठी संघ काम करत आहे. गणेश मूर्ती आणि दुर्गापूजा वेळी होणारे वाद आणि हिंदू सणांना लागणारे गालबोट याबद्दल संघाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.