Ratan Tata : रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा

मुंबई : जगातील मोठे उद्योगपती तथा दानशुर व्यक्तिमत्व असलेले टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. भारताच्या उद्योग क्षेत्रातील पितामह म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावरच नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळला जात आहे. तसेच रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असून सध्या त्यांचे पार्थिव राहत्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

एक दिवसाचा दुखवटा जाहीर
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज गुरुवारी १० ऑक्टोबर एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील. तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.

रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची सूचना दिली आहे. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर सकाळी १० वाजता हलेकाय येथून त्यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात आले. यानंतर सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए या ठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. एनसीपीएच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून लोकांना अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, तर प्रवेशद्वार क्रमांक २ मधून नागरिकांना दर्शन घेऊन बाहेर पडता येईल.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
यानंतर दुपारी ३.३० वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. यानंतर संध्याकाळी ४ वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोडवरुन ही अंत्ययात्रा वरळीतील स्मशानभूमीत पोहचेल. यानंतर सायंकाळी ४.३० वाजता टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत